रत्नागिरी : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. ग्रामीण भागातील विहिरी, ओढे आणि नैसर्गिक पाणीस्रोत आटू लागल्याने अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत असून प्रशासनालाही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.
जिल्हा परिषद रत्नागिरीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जाहीर केलेल्या ताज्या अहवालानुसार, जिल्ह्यातील ५५ गावे आणि १२९ वाड्यांमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून जिल्ह्यातील तब्बल ४२ हजार ६३५ ग्रामस्थांना टंचाईची झळ बसत आहे.
रत्नागिरी तालुक्याला सर्वाधिक फटका बसल्याचे चित्र समोर आले आहे. तालुक्यातील १० गावे आणि ३९ वाड्यांमधील तब्बल २३ हजार ७११ नागरिक सध्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. या भागासाठी १० खाजगी टँकर्स नियुक्त करण्यात आले असून आतापर्यंत १०७८ फेऱ्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रशासनावर मोठा ताण निर्माण झाला आहे.
संगमेश्वर तालुक्यातही परिस्थिती चिंताजनक बनली आहे. येथील १५ गावे आणि ३१ वाड्यांमधील ६ हजार ५१८ नागरिकांना पाणीटंचाईचा फटका बसत आहे. या भागात १ शासकीय आणि २ खाजगी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे.
मंडणगड तालुक्यातील ६ गावे आणि ६ वाड्यांमध्ये ५ हजार २६५ ग्रामस्थांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. येथे १ खाजगी टँकरद्वारे आतापर्यंत २१४ फेऱ्या मारण्यात आल्या आहेत.
चिपळूण तालुक्यातील १० गावे आणि २४ वाड्यांमधील २ हजार ९१५ नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. खेड तालुक्यातील ११ गावे आणि २१ वाड्यांमधील १ हजार ४१६ लोकांना १ शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
दापोली आणि गुहागर तालुक्यांमध्येही परिस्थिती गंभीर होत असून अनुक्रमे १ हजार ८०३ आणि १ हजार ७ नागरिक पाणीटंचाईमुळे प्रभावित झाले आहेत. या भागांतही टँकरच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, लांजा आणि राजापूर तालुक्यांना सध्या तरी मोठा दिलासा मिळाला आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये अद्याप एकाही गावात किंवा वाडीत टँकर सुरू करण्याची गरज भासलेली नाही.
संपूर्ण जिल्ह्यात सध्या ३ शासकीय आणि १५ खाजगी अशा एकूण १८ टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. प्रशासनाने आतापर्यंत १६४४ फेऱ्या पूर्ण करून टंचाईग्रस्त भागांमध्ये पाणी पोहोचवले आहे. परिस्थिती आणखी गंभीर झाल्यास अतिरिक्त टँकर्स तैनात करण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे.
मात्र मे महिन्याच्या अखेरीस उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असल्याने पाण्याचे संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













