गुहागर : एसटी चालक-वाहक दारूच्या नशेत; ग्रामस्थांनी प्रवासी उतरवून बस अडवली, मात्र रिकामी बस चिपळूणकडे पळवली

banner 468x60

मार्गताम्हणे – गुहागर–चिपळूण मार्गावरील मार्गताम्हणे येथे गुहागर आगारातील एसटी बसमधील चालक व वाहक हे दारूच्या नशेत आढळून आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे प्रवाशांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला असून एसटी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकारानंतर परिसरात तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त केली जात आहे.

banner 728x90

गुहागर आगाराची एसटी बस क्रमांक MH-20-BL-1542 ही बस गुहागरहून चिपळूणकडे निघाली असताना बसमधील चालक आणि वाहक हे दोघेही दारूच्या नशेत असल्याचे काही प्रवाशांच्या लक्षात आले. प्रवासादरम्यान चालकाची गाडी चालवण्याची पद्धत संशयास्पद वाटत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

बस मार्गताम्हणे येथे पोहोचताच काही प्रवाशांनी तात्काळ स्थानिक ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ पुढाकार घेत बस थांबवली व बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या खाली उतरवून घेतले. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बस अडवून ठेवण्यात आली होती.

मात्र सर्व प्रवासी उतरल्याचे लक्षात येताच चालक व वाहकाने ग्रामस्थांची परवानगी न घेता रिकामी बस चिपळूणच्या दिशेने पळवून नेली. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप उसळला.

दरम्यान, काही नागरिकांनी या घटनेची माहिती तात्काळ गुहागर आगार प्रमुखांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून दिली. मात्र चालक-वाहक चिपळूण बस स्थानकात पोहोचल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी अथवा चौकशी झाली की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत अशा प्रकारची बेजबाबदार वर्तन प्रवाशांच्या जीवाशी खेळणारे असल्याने संबंधित चालक व वाहकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. आता एसटी प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन नेमकी कोणती कारवाई करते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *