गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील कोकण एल.एन.जी. कंपनीच्या जेटीजवळ समुद्रात पडून एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. राहुल कुमार लालसाहेब यादव (वय २२, रा. शरीफपूर, शिखिखुर्द, ता. हंडीया, जि. प्रयागराज, उत्तर प्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो ‘ओशन स्पार्कल लिमिटेड’ कंपनीच्या ‘ओशन स्वान १’ या टग जहाजावर प्रशिक्षणार्थी डेक रेटिंग म्हणून कार्यरत होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गॅसवाहू जहाजाला जेटीपर्यंत आणण्याचे काम पूर्ण
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कुमार यादव हा २३ सप्टेंबर २०२६ पासून ‘ओशन स्वान १’ या जहाजावर ट्रेनी डेक रेटिंग (क्रू) म्हणून काम करत होता. १० ऑक्टोबर रोजी ‘एल.एन.जी.सी. गॅस पोलारिस’ हे गॅसवाहू जहाज अंजनवेल येथील जेटीवर आले होते. या मोठ्या जहाजाला जेटीपासून सुमारे तीन नॉटिकल मैल अंतरावरून सुरक्षितपणे जेटीपर्यंत आणण्यासाठी आणि योग्य दिशा दाखवण्यासाठी ‘ओशन स्वान १’ या टग जहाजाने मदत केली होती.
सकाळी साडेअकराच्या सुमारास हे काम पूर्ण झाल्यानंतर ‘ओशन स्वान १’ हे जहाज जेटीपासून काही अंतरावर असलेल्या ब्रेक वॉटरजवळ नांगर टाकून थांबले होते.
काही मिनिटांतच समुद्रात पडल्याची माहिती
दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास जहाजाचे टग मास्टर शाहरुख हिशामुद्दीन हुसेन हे जेवण करून विश्रांतीसाठी आपल्या खोलीत गेले होते. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत जहाजावरील सहकारी सनी मसिह याने धावत येऊन राहुल कुमार समुद्रात पडल्याची माहिती दिली. राहुलचा मोबाईल जहाजाच्या डेकवर पडलेला असल्याचेही त्याने सांगितले.
ही माहिती मिळताच टग मास्टर यांनी तातडीने डेकवर जाऊन पाहणी केली. त्यावेळी राहुल कुमार हा जहाजापासून काही अंतरावर समुद्राच्या पाण्यात उताण्या स्थितीत तरंगताना दिसून आला.
स्पीड बोटीच्या मदतीने समुद्रातून बाहेर काढले
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जहाजावरील फर्स्ट मास्टर जयशंकर शर्मा यांनी तातडीने जेटी कंट्रोल आणि सुरक्षा स्पीड बोटीला व्हीएचएफ बिनतारी संदेशाद्वारे मदतीसाठी पाचारण केले. त्यानंतर स्पीड बोटीच्या मदतीने राहुल कुमार याला समुद्रातून बाहेर काढून मटेरियल जेटीवर आणण्यात आले.
तेथून रुग्णवाहिकेद्वारे त्याला अंजनवेल येथील आर.जी.पी.पी.एल. मेडिकल सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक यांनी दुपारी १.५७ वाजता तपासणी करून त्याला उपचार सुरू करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
गुहागर पोलिसांकडून पुढील तपास सुरू
या घटनेची माहिती जहाजाचे टग मास्टर शाहरुख हुसेन यांनी दिल्यानंतर गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बी.एन.एस.एस.) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक ४२/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे. राहुल कुमार यादव हा समुद्रात नेमका कोणत्या परिस्थितीत पडला, याबाबत अधिक तपशील समोर आलेला नसून, गुहागर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
तरुण वयात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











