चिपळूण येथील पदसपटी विभागातील श्री क्षेत्र टेरव येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कुलस्वामिनी भवानी-वाघजाई मातेच्या मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही भव्य नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ११ ऑक्टोबर ते सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक विधी, पूजन तसेच पारंपरिक रूढी-परंपरांनुसार नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट तसेच पालखीची विशेष सजावट करण्यात येणार आहे. उत्सवादरम्यान श्री भवानी, वाघजाई, महालक्ष्मी, कालकाई आणि कुलस्वामिनी देवींच्या मूर्तींना वारानुसार नवरंगांच्या साड्या नेसवून सोन्या-चांदीच्या अलंकारांनी सालंकृत करण्यात येणार आहे. त्यामुळे नवरात्रातील प्रत्येक दिवशी देवीचे विविध रूप भाविकांना अनुभवता येणार आहे.
श्री क्षेत्र टेरव येथील मंदिरात कृष्णशिळेतील तब्बल ७.५ फूट उंचीची श्री भवानी मातेची आकर्षक मूर्ती आहे. याशिवाय मंदिरात गणपती, वाघजाई, भूमिगत कालकाई, महालक्ष्मी, कुलस्वामिनी, महादेवाची पिंडी, भैरी, केदार तसेच नवदुर्गांच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धीदात्री या नवदुर्गांच्या मूर्ती सविस्तर माहितीसह स्थापित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या काळात या देवस्थानाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त होते.
भैरी-भवानी आणि नवदुर्गांचे एकत्रित दर्शन घडणारे हे देवस्थान महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण देवस्थानांपैकी एक असल्याचे ग्रामस्थ सांगतात. कोकणातील दाक्षिणात्य वास्तुशैलीत उभारलेले मंदिर, भव्य गोपुरे, आकर्षक देवतामूर्ती, मनमोहक उद्यान, देवराईतील हिरवाई आणि आल्हाददायक वातावरण यामुळे श्री क्षेत्र टेरव हे धार्मिक पर्यटनाचेही केंद्र म्हणून विकसित होत आहे.
श्री भवानी-वाघजाई माता हे जागृत देवस्थान असून, नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावून जाणारी संकटविमोचक देवी म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे. महाराष्ट्र शासनाने या स्थळाला यात्रास्थळ व पर्यटनाचा ‘क’ दर्जा, तसेच तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा प्रदान केला आहे.
नवरात्रोत्सवाच्या कालावधीत मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले राहणार असून, ओटीचे साहित्यही मंदिरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. श्री भवानी-वाघजाई मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह विविध भागांतून येणाऱ्या भाविकांनी नवरात्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त ग्रामस्थ, श्री क्षेत्र टेरव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













