दापोली : संगीत नाटककार पुरस्कारासाठी गिम्हवणेच्या विलास कर्वे यांची निवड

banner 468x60

मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीने नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना दरवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या नाट्य सेवा गौरव पुरस्कारांपैकी यंदाच्या य. वि. भातखंडे पुरस्कृत डॉ. अ. ना. भालेराव स्मृती प्रीत्यर्थ “संगीत नाटककार” पुरस्कारासाठी दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक व गायक विलास कर्वे यांची निवड झाली आहे. साहित्य संघाने ११ जुलै २०२६ रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे ही घोषणा करण्यात आली.


मुंबई मराठी साहित्य संघाचे प्रमुख संस्थापक कै. डॉ. अ. ना. भालेराव यांच्या स्मृतिदिनी, बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी मुंबई मराठी साहित्य संघाच्या डॉ. भालेराव सभागृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.


विलास कर्वे यांनी उत्सवी रंगभूमीवर ‘सांगा मुकुंद कुणी हा पाहिला’, ‘ज्ञानियांचा राजा’ आणि ‘श्यामची आई’ या संगीत बालनाट्यांचे लेखन, दिग्दर्शन आणि सादरीकरण केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेसाठी ‘गोपिका रमणू स्वामी माझा’, ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ आणि ‘संभवामी युगे युगे’ या संगीत नाटकांचे लेखन, दिग्दर्शन आणि सादरीकरण करून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.


यापैकी ‘गोपिका रमणू स्वामी माझा’ या नाटकाच्या लेखनासाठी त्यांना राज्यस्तरीय प्रथम क्रमांक, तर ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या नाटकाच्या लेखनासाठी द्वितीय क्रमांकाचा मान मिळाला आहे.


सध्या दापोली पंचक्रोशीतील एका सुप्रसिद्ध व्यावसायिक संगीत नाटक गायक-नट आणि त्यांच्या मुंबईतील संगीत तपस्वी गुरू यांच्या चरित्रावर आधारित ‘संगीत स्वर संगम’, तसेच शिवमहापुराण ग्रंथातील एका पौराणिक कथेवर आधारित ‘संगीत शिवरंजनी’ ही दोन नवी संगीत नाटके त्यांनी लिहिली असून ती लवकरच राज्य संगीत नाट्य स्पर्धेत सादर होणार आहेत.


पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विलास कर्वे यांनी
देव गजानन यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत मुंबई मराठी साहित्य संघाचे पदाधिकारी व निवड समितीचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच अनेक वर्षे साथ देणारे नाट्यगुरू, दापोली पंचक्रोशीतील कलाकार, गायक-गायिका, संगीतकार, तंत्रज्ञ, साथीदार आणि रसिक प्रेक्षक यांचेही त्यांनी ऋण व्यक्त केले. हा सन्मान आपल्या कुटुंबीयांसह या सर्वांना समर्पित करत असल्याचे त्यांनी सांगितले.


कोकणातील एका छोट्या गावातील रंगकर्मीला मिळालेला हा सन्मान संपूर्ण कोकणातील नाट्य चळवळीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत, सुमारे दोन शतकांची समृद्ध परंपरा लाभलेल्या मराठी संगीत रंगभूमीच्या संवर्धनासाठी कोकणात अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार विलास कर्वे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *