दाभोळ : कोळथरे येथे चारसूत्री भात लागवडीचे प्रात्यक्षिक, आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना परिचय

banner 468x60

दापोली तालुक्यातील कोळथरे गावात भातशेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने चारसूत्री भात लागवड पद्धतीचे प्रात्यक्षिक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. प्रगतिशील शेतकरी श्री. साहिल पेठे यांच्या शेतात आयोजित करण्यात आलेल्या या प्रात्यक्षिकात परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत प्रत्यक्ष शेतात उतरून चारसूत्री पद्धतीने भात लागवड केली.

या प्रात्यक्षिकावेळी दाभोळ मंडळाचे मंडळ कृषी अधिकारी आर. आर. मंचरे तसेच उपकृषी अधिकारी. डी. एच. जाधव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना चारसूत्री भात लागवड पद्धतीचे महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगितले. पारंपरिक लागवड पद्धतीच्या तुलनेत चारसूत्री पद्धतीमध्ये रोपांमधील योग्य अंतर राखले जाते.

त्यामुळे प्रत्येक रोपाला पुरेसा सूर्यप्रकाश, हवा आणि अन्नद्रव्ये मिळून पिकाची वाढ अधिक जोमदार होते. तसेच कमी बियाण्यांचा वापर करून अधिक उत्पादन घेणे शक्य होते, असे त्यांनी सांगितले.

यावेळी गिरीपुष्पाचा योग्य वापर, सेंद्रिय घटकांचा समतोल वापर, तण व्यवस्थापन, पाण्याचे नियोजन तसेच उत्पादनवाढीसाठी आवश्यक असलेल्या विविध तांत्रिक बाबींवरही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे देत आधुनिक शेती तंत्रज्ञान स्वीकारण्याचे आवाहन केले.

प्रात्यक्षिकादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात चारसूत्री पद्धतीने भात लागवड करत या तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली. आधुनिक पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादन खर्चात बचत होऊन अधिक दर्जेदार आणि भरघोस उत्पादन मिळू शकते, असा विश्वास अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी कृषी विभागामार्फत अशा प्रकारची प्रात्यक्षिके गावागावांत सातत्याने आयोजित करण्यात यावीत, अशी अपेक्षाही उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाल्याने भविष्यात अधिकाधिक शेतकरी चारसूत्री भात लागवड पद्धतीचा अवलंब करतील, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *