दाभोळ ए.के.आय. ट्रस्ट, मुंबई संचलित ए.के.आय. उर्दू सेमी इंग्लिश हायस्कूल, दाभोळ येथे विद्यार्थी मंत्रिमंडळ पदभार सोपविण्याचा समारंभ तसेच शाळा व्यवस्थापन समिती व पालक-शिक्षक संघ स्थापनेचा सोहळा नुकताच अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात मोठ्या दिमाखात पार पडला. विद्यार्थी नेतृत्व, शैक्षणिक गुणवत्ता आणि पालकांचा सहभाग यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थी मंत्रिमंडळाच्या आकर्षक संचलनाने झाली. लाल गालिच्यावरून शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांनी प्रवेश करत उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नव्याने निवड झालेल्या विद्यार्थी प्रतिनिधींना बिल्ले प्रदान करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मविश्वासपूर्ण शैलीत स्वतःची ओळख करून दिली. शपथविधी सोहळ्यात सर्व विद्यार्थी प्रतिनिधींनी निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पणभावाने आपली जबाबदारी पार पाडण्याची शपथ घेतली. “हम होंगे कामयाब” या प्रेरणादायी गीताने संपूर्ण सभागृह उत्साहाने भारावून गेले.

यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी मुख्य विद्यार्थिनी (Head Girl) म्हणून. जोया जाकीर निलिक्कर तर मुख्य विद्यार्थी (Head Boy) म्हणून. सदिम सईद नाखवा यांची निवड करण्यात आली. याशिवाय एकूण २१ विद्यार्थ्यांना विविध जबाबदाऱ्या देऊन सक्षम विद्यार्थी मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली.


कार्यक्रमात पंचायत समिती दापोलीच्या उपसभापती नम्रता तोडणकर, केंद्रप्रमुख दिलीप जाधव आणि शाळेचे मुख्याध्यापक इमरान दाऊद खान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नेतृत्वगुण, शिस्त, सामाजिक जबाबदारी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. उपसभापती नम्रता तोडणकर यांनी पंचायत समितीमार्फत शाळेच्या शैक्षणिक व प्रशासकीय गरजांसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यानंतर शाळा व्यवस्थापन समिती व पालक-शिक्षक संघ स्थापनेचा कार्यक्रम पार पडला. मागील वर्षातील समिती सदस्यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांचे आभार मानण्यात आले आणि त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर नव्या समितीच्या अध्यक्षपदी. वाहीद सदरुद्दीन निलिक्कर, तर उपाध्यक्षपदी रेशमा शकील मुकादम यांची निवड करण्यात आली. नव्या समितीतील सर्व सदस्यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सक्रिय सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
या वेळी समाजसेवक अब्दुल करीम हसन बैग यांनी यंदाच्या माध्यमिक शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्याला रोख रुपये १०,००० चे पारितोषिक प्रदान केले. तसेच पुढील वर्षीही ही गौरवपर पारितोषिक योजना सुरू ठेवण्याची घोषणा करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आफरीन शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
शाळेच्या प्रगतीसाठी सातत्याने सहकार्य करणारे माजी विद्यार्थी, प्रगत समिती, तसेच झर्फ एम.एच.ओ. ग्रुप, दुबईचे जाकीर हुसेन चौगले, अब्दुल करीम हसन बैग, मोअज्जम माहतायी, फरनाज नाटेकर (नूर-ए-खिदमत ट्रस्ट, खेड), बदरुद्दीन बुखारी आणि सर्व पालक यांचे शाळेने विशेष आभार व्यक्त केले.
या सोहळ्यास पंचायत समिती दापोलीच्या उपसभापती नम्रता तोडणकर, केंद्रप्रमुख दिलीप जाधव, प्रगत समिती सदस्य व माजी विद्यार्थी वाहीद निलिक्कर, कबीर मनियार, मुदस्सर ममतुले, साजिद जमादार, अजीम दर्वेश, बदरुद्दीन बुखारी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रेशमा मुकादम तसेच मान्यवर, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शिस्त, उत्साह आणि प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













