चिपळूण : बैठकीत व्हॉईस रेकॉर्डिंगच्या संशयातून तरुणाला मारहाण, दोन मोबाईल हिसकावल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील वहाळ कुंभारवाडी येथे बैठकीदरम्यान मोबाईलमध्ये व्हॉईस रेकॉर्डिंग केल्याच्या संशयातून एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याचे दोन मोबाईल हिसकावून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

banner 728x90

याप्रकरणी धिरज दिलीप कुंभार (वय २९, सध्या रा. वहाळ कुंभारवाडी, ता. चिपळूण; मूळ रा. वडाळा पूर्व, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १७ मे रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास वहाळ येथील दिलीप मांडवकर यांच्या घरी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस धिरज कुंभार उपस्थित होते.


बैठकीदरम्यान धिरज कुंभार यांनी ओपो कंपनीच्या मोबाईलमध्ये व्हॉईस रेकॉर्डिंग केल्याचा संशय उपस्थित आरोपींना आला. यानंतर आरोपी क्रमांक १ भगवान मांडवकर यांनी “मोबाईल तपासायचा आहे,” असे सांगत फिर्यादीकडील वीवो आणि ओपो कंपनीचे प्रत्येकी सुमारे १५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोप आहे.

फिर्यादीनुसार, मोबाईल परत न करता आरोपींनी धिरज कुंभार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांचे मामेभाऊ दिनेश वहाळकर यांना तातडीने बैठकीला बोलावून आणण्यास भाग पाडत, “त्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय, “उद्या बैठकीला हजर राहा, नाहीतर गावात येऊ देणार नाही,” अशा स्वरूपाची धमकी आरोपी महेंद्र कुंभार यांनी फोनवरून दिल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणी सावर्डे पोलिसांनी भगवान मांडवकर, अभिजित मांडवकर, प्रकाश शिरकर, संतोष भैरवकर आणि महेंद्र कुंभार (सर्व रा. वहाळ कुंभारवाडी, ता. चिपळूण) यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सावर्डे पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *