गुलजार गोलंदाज, चिपळूण यांचा विशेष लेख
सहकाराच्या वाटेवर अनेक पाऊलखुणा उमटतात; मात्र काही पाऊलखुणा काळाच्या ओघात पुसल्या जात नाहीत, उलट त्या पुढच्या पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरतात. कोकणाच्या मातीत सहकाराची अशीच एक भक्कम पाऊलखूण उमटविणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे चिपळूण नागरी सहकारी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष मा. सुभाषराव चव्हाण साहेब! आज, ७ सप्टेंबर २०२६ रोजी ते वयाची ७९ वर्षे पूर्ण करीत आहेत. मात्र हे केवळ एका वयाचा टप्पा नाही; हा सात दशकांहून अधिक काळाच्या अनुभवाचा, संघर्षाचा, जिद्दीचा, सामाजिक बांधिलकीचा आणि सहकाराच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याच्या अखंड ध्यासाचा गौरव करण्याचा दिवस आहे. सहकारातील या समर्पित नेतृत्वाला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!*
वय वाढत जाते, शरीराची धावपळ काहीशी कमी होते; पण एखाद्या ध्येयवेड्या माणसाच्या विचारांची गती कधीच थांबत नाही. मा. सुभाषराव चव्हाण साहेब यांच्याकडे पाहिले की याची प्रचिती येते. वयाच्या ७९ व्या वर्षीही त्यांची कार्याची ऊर्मी, नव्या संकल्पनांचा ध्यास आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ आजही तितकीच जिवंत आहे. ते कोकणातील सहकार चळवळीला व्यापक सामाजिक आणि आर्थिक दिशा देणारे दूरदृष्टीचे नेतृत्व आहे.
चिपळूण तालुक्यातील उभळे या छोट्याशा गावातून सुरू झालेला हा प्रवास आज हजारो कुटुंबांच्या आशेचा आधार बनला आहे. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. त्या काळात कोकणातील तरुणांसाठी मुंबई म्हणजे रोजगाराची आणि भविष्याची वाट. चव्हाण साहेबही मुंबईला गेले; नोकरी केली; मात्र मन मात्र आपल्या गावच्या मातीमध्येच राहिले. आपल्या परिसरासाठी, आपल्या माणसांसाठी काहीतरी करण्याची अस्वस्थता त्यांना पुन्हा कोकणात घेऊन आली. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकरीच्या अनुभवातून त्यांना सहकाराची ताकद जवळून समजली आणि त्याच अनुभवातून त्यांच्या मनात एक विचार रुजला, की सामान्य माणसाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचे असेल, तर त्याच्या हातात केवळ मदतीचा हात नव्हे, तर स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद द्यावी लागेल. याच विचारातून १९ ऑक्टोबर १९९३ रोजी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली.
केवळ सहकारी संस्था नव्हे; विश्वासाचे साम्राज्य!
त्या काळात ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे आर्थिक अडचणींमुळे सावकारांच्या विळख्यात अडकलेली होती. कर्जासाठी कठीण अटी स्वीकाराव्या लागत होत्या. अशा वेळी सर्वसामान्य माणसाच्या आर्थिक गरजांना विश्वासाचे आणि सन्मानाचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने सुरू झालेली चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था आज ५० शाखांसह विस्तारली आहे. या संस्थेची वाढ ही केवळ शाखांची किंवा आर्थिक व्यवहारांची वाढ नाही; ती विश्वासाची वाढ आहे. “आपली माणसे...आपली संस्था” या ब्रीदवाक्याला केवळ शब्द न ठेवता त्यामागचा आत्मा प्रत्यक्ष व्यवहारात उतरविण्याचे काम या संस्थेने केले. शेतकरी, व्यापारी, छोटे-मोठे उद्योजक, नोकरदार, महिला, तरुण अशा समाजातील विविध घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम संस्थेने केले.
नैसर्गिक आपत्ती असो, कोरोना महामारीसारखे संकट असो किंवा समाजासमोर उभे राहिलेले अन्य कोणतेही आव्हान असो सहकार संस्थेने आपल्या सभासदांशी आणि समाजाशी असलेले नाते केवळ व्यवहारापुरते मर्यादित ठेवले नाही. गरजेच्या वेळी मदतीचा हात पुढे करण्याची सामाजिक जाणीव संस्थेने जपली. म्हणूनच चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची ओळख एका आर्थिक संस्थेपेक्षा अधिक व्यापक झाली.
सहकाराच्या विचाराला मिळाले नवे क्षितिज
मा. सुभाषराव चव्हाण साहेबांच्या विचारांची खरी वैशिष्ट्यपूर्ण बाजू म्हणजे त्यांनी सहकाराला केवळ कर्जवाटपाच्या चौकटीत कधीच बंदिस्त केले नाही. माणसाला कर्ज देऊन उभे करणे आणि त्याच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देऊन त्याचे उत्पन्न वाढविणे या दोन्ही गोष्टीतला फरक त्यांनी ओळखला. याच दूरदृष्टीतून वाशिष्ठी डेअरीची संकल्पना आकाराला आली. कोकणात दूध व्यवसायाला मोठी क्षमता असूनही या क्षेत्रातील अनेक प्रयत्न अपेक्षित यश मिळवू शकले नव्हते. अशा पार्श्वभूमीवर वाशिष्ठी डेअरी उभारण्याचा निर्धार म्हणजे निश्चितच मोठे धाडस होते. मात्र ध्येय स्पष्ट असेल, तर अडचणी या प्रवासातील अडथळे न राहता त्या यशाच्या पायऱ्या बनतात, याचे उदाहरण वाशिष्ठी डेअरीने घालून दिले.
वाशिष्ठी डेअरीची ही जबाबदारी चव्हाण साहेबांनी त्यांचे जावई श्री. प्रशांत बबन यादव आणि कन्या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना प्रशांत यादव यांच्यावर सोपवली. यादव दाम्पत्याने सहकाऱ्यांच्या साथीने घेतलेल्या अथक परिश्रमातून अवघ्या तीन वर्षांत वाशिष्ठी डेअरीने उल्लेखनीय यश मिळवले.
आज सुमारे १५ हजार शेतकरी वाशिष्ठी डेअरीशी जोडले गेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुमारे ५० हजार लिटर दुधाचे संकलन होत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ, योग्य मोबदला आणि सातत्यपूर्ण आधार देण्याबरोबरच शेकडो तरुण आणि महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे कामही या उपक्रमातून झाले आहे.
शासकीय दूध संकलन यंत्रणा बंद पडल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वाशिष्ठी डेअरीने निर्माण केलेला आधार विशेष महत्त्वाचा ठरला. हा प्रकल्प खासगी असला, तरी त्यामागची कार्यप्रेरणा सहकाराची आहे. नफ्यापेक्षा शेतकऱ्याचे हित, व्यवहारापेक्षा विश्वास आणि व्यवसायापेक्षा ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्याची भावना हीच चव्हाण साहेबांच्या विचारांची खरी ओळख आहे.
कृषी महोत्सव : शेतकऱ्यांच्या स्वप्नांना व्यासपीठ
शेतकऱ्याला केवळ आर्थिक मदत करून त्याचा विकास पूर्ण होत नाही. त्याला आधुनिक शेतीची माहिती, तंत्रज्ञानाची ओळख, बाजारपेठेची जाण आणि नव्या संधींची माहिती मिळणे तितकेच आवश्यक आहे, हा विचार चव्हाण साहेबांनी सातत्याने मांडला. याच विचारातून वाशिष्ठी डेअरी आणि चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सलग तीन वर्षे कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला. शेतकरी, महिला, तरुण-तरुणी, बचत गट आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या घटकांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा हा प्रयत्न कोकणातील कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचा ठरला.
शेतीकडे केवळ परंपरागत व्यवसाय म्हणून न पाहता त्याकडे आधुनिक उद्योजकतेच्या दृष्टीने पाहण्याची मानसिकता निर्माण करणे, ही या उपक्रमामागची व्यापक भूमिका होती. म्हणूनच चिपळूणमधील कृषी महोत्सव हे केवळ प्रदर्शन न राहता शेतकऱ्यांच्या ज्ञानवृद्धीचे आणि नव्या संधींच्या शोधाचे व्यासपीठ बनले.
कोकणच्या सहकाराला दिली स्वतंत्र ओळख
महाराष्ट्रातील सहकाराचा इतिहास पाहिला, तर पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने, कोल्हापूरचा सहकार, पुण्याची शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील सहकार परंपरा यांचा उल्लेख आवर्जून केला जातो. मात्र कोकणाच्या संदर्भात सहकाराची भक्कम आणि व्यापक वाटचाल घडविणाऱ्या नेतृत्वाचा विचार केला, तर मा. सुभाषराव चव्हाण साहेबांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. त्यांनी सहकाराला केवळ आर्थिक व्यवहाराचे माध्यम मानले नाही. त्यांच्या दृष्टीने सहकार म्हणजे माणसांना जोडण्याची प्रक्रिया, विश्वास निर्माण करण्याची शक्ती आणि समाजाला आत्मनिर्भर बनविण्याचे साधन आहे. हीच त्यांची सर्वांत मोठी देणगी आहे. कारण, एखादी संस्था उभी करणे तुलनेने सोपे असते; पण त्या संस्थेला लोकांच्या मनात स्थान मिळवून देणे कठीण असते. एखाद्या संस्थेची शाखा वाढवणे शक्य असते; पण तिच्याबद्दलचा विश्वास प्रत्येक गावात पोहोचवणे ही खरी कसोटी असते. मा. चव्हाण साहेबांनी ही कसोटी आपल्या कार्यातून उत्तीर्ण केली आहे.
७९ वर्षांचा टप्पा… पण प्रवास अजूनही सुरूच!
मा. सुभाषराव चव्हाण साहेबांचा आजचा वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा दिवस नाही; तो त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा दिवस आहे. कारण त्यांच्या आयुष्याकडे पाहिले, तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, की त्यांनी परिस्थितीची वाट पाहिली नाही; त्यांनी परिस्थितीच बदलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सहकारातून आर्थिक बळ दिले. सहकारातून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या. शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण भागातील तरुणांना नव्या संधीची दारे खुली केली. महिलांना आर्थिक प्रवाहात सहभागी करून घेण्याची दिशा दिली. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपण समाजाचे काही देणे लागतो, ही भावना आपल्या कार्यातून जिवंत ठेवली.
म्हणूनच चव्हाण साहेबांचा प्रवास हा एका व्यक्तीचा प्रवास नाही. तो कोकणातील असंख्य कुटुंबांच्या आशेचा प्रवास आहे. तो विश्वासाचा प्रवास आहे. तो सहकारातून स्वावलंबनाकडे जाणाऱ्या समाजाचा प्रवास आहे.
मा. चव्हाण साहेब ७९ वर्षांचे झाले म्हणून त्यांच्या कार्याला विराम मिळालेला नाही. उलट आयुष्यभराच्या अनुभवातून आलेली परिपक्वता आणि आजच्या पिढीच्या संधींची जाण यांची सांगड घालून सहकाराला नवी दिशा देण्याची त्यांची धडपड आजही सुरू आहे.
याच कारणामुळे मा. सुभाषराव चव्हाण साहेब हे सहकार क्षेत्रातील केवळ एक नाव नाही, तर एक विचार आहेत; समर्पित नेतृत्व आहे, एक प्रेरणा आहेत आणि अनेकांसाठी चालता-बोलता आदर्श आहेत.
त्यांच्या सहकाराच्या कार्याची ज्योत अशीच अखंड तेवत राहो, त्यांच्या अनुभवाचा प्रकाश पुढील पिढ्यांना दिशा देत राहो आणि त्यांच्या आयुष्यात आरोग्य, समाधान, आनंद व दीर्घायुष्य नांदो, हीच वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक सदिच्छा!
मा. सुभाषराव चव्हाण साहेबांना ७९ व्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
चौकट
मा. सुभाषराव चव्हाण साहेबांच्या कार्याचा गौरव…
मा. सुभाषराव चव्हाण साहेबांना अनेक संस्थांनी विविध पुरस्कारांनी सन्मानित करून त्यांच्या सहकार आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याचा गौरव केला आहे.
- १५.११.२००९ : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे शिक्षणतज्ज्ञ मा. डॉ. गजानन पाटील यांच्या हस्ते सहकार रत्न पुरस्कार
- ३०.११.२००९ : महाराष्ट्र जर्नलिस्ट फाऊंडेशन पुणे यांच्यातर्फे नवी मुंबई येथे ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ शरद उपाध्ये यांच्या हस्ते कोकण रत्न पुरस्कार
- ०५.०२.२०१० : श्री शिवशक्ती सामाजिक प्रतिष्ठान मुंबईतर्फे परळ येथे सामाजिक कार्यकर्ते मा. भालचंद्र पाटील यांच्या हस्ते सहकार रत्न पुरस्कार
- २७.०५.२०१० : महाराष्ट्र जर्नलिस्ट फाऊंडेशन पुणे यांच्यातर्फे गोवा येथे गोवा राज्याचे मुख्यमंत्री मा. दिगंबर कामत यांच्या हस्ते दी प्राईड ऑफ इंडिया : भास्कर अॅवॉर्ड २०१० पुरस्कार
- २९.०८.२०१० : साहित्यप्रेमी सार्वजनिक वाचनालय इस्लामपूर आयोजित राज्यस्तरीय साहित्यप्रेमीतर्फे कोल्हापूर येथे सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता व निर्माता गिरीश ओक यांच्या हस्ते सहकार रत्न पुरस्कार
- २०.०२.२०११ : कोहिनूर फाऊंडेशन मुंबईतर्फे सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा पवार यांच्या हस्ते सहकार रत्न पुरस्कार
- २५.०१.२०१९ : महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी पुणे आयोजित अॅड्. रावसाहेब शिंदे विशेष सन्मान सहकार पुरस्कार भारताचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व महाराष्ट्राचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली सन्मानित करण्यात आले
- १५.१०.२०२३ : लोकशाही मराठी वृत्तवाहिनीतर्फे माजी केंद्रीय कृषिमंत्री मा. शरद पवार साहेबांच्या हस्ते लोकशाही सहकार सन्मान २०२३ पुरस्कार
- २३.०९.२०२४ : चिपळूणमधील जीएसके न्यूज, मराठी समाचार आणि राजसत्ता न्यूज यांच्यातर्फे माजी केंद्रीय मंत्री मा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते कोकण भूषण पुरस्कार
- १३.०४.२०२५ : कोकण मराठी पत्रकार संस्थेतर्फे सहकार भूषण पुरस्कार
- ०४.०४.२०२६ : नवभारत-नवराष्ट्र वृत्तपत्र समूहातर्फे जीवन गौरव पुरस्कार

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













