दापोली- रत्नागिरी जिल्हा परिषद आयोजीत ‘नासा-इस्रोस विद्यार्थी भेट’ उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षा व प्रत्यक्ष मुलाखतीत उज्ज्वल यश संपादन केलेल्या दापोली तालुक्यातील पाच विद्यार्थ्यांची भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली असून दि. १९ मे ते दि. २३ मे २०२६ या कालावधीत हा अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला आहे.
दापोली पंचायत समितीचे सभापती उन्मेष राजे, गटविकास अधिकारी गणेश मंडलीक, माजी सभापती शांताराम पवार तसेच गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती दापोली येथे आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात हे पाचही विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक तसेच पालक, मुख्याध्यापक यांचे अभिनंदन करुन या सर्व विद्यार्थ्यांना इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. नासा व इस्रो अभ्यास दौर्यासाठी पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून गौरव होत आहेच, मात्र नासा-इस्रो अभ्यास दौर्यासाठी दापोली तालुक्यातून पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी योगेश कदम यांच्या मार्गदर्शनातून तसेच पंचायत समिती दापोलीच्या सेस फंडातून आणखी काही लाभाच्या योजना राबवून या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन व पाठीवर कौतुकाची थाप देण्यात येईल असे आश्वासन पंचायत समिती सभापती उन्मेष राजे यांनी याप्रसंगी बोलताना दिले.
गेल्या चार वर्षांपासून रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या इयत्ता पाचवी ते सातवीतील सर्व विद्यार्थ्यांसाठी ‘नासा-इस्रोस विद्यार्थी भेट’ या उपक्रमांतर्गत चाळणी परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे.
केंद्रस्तर, तालुकास्तर आणि पुढे जिल्हा स्तर परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरी जिल्हा परिषद स्वखर्चाने अमेरीकेतील नासा व भारतातील इस्रो या अवकाश संशोधन संस्थांची प्रत्यक्ष भेट व अभ्यास दौरा घडवून आणते. या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थ्यांना कोणताही वैयक्तिक खर्च करावा लागत नाही. यासाठीचा संपूर्ण खर्च रत्नागिरी जिल्हा परिषदच करते. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या वर्षासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमांतर्गत स्पर्धा परीक्षेत दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर शाळेतील कु. नीरजा मनोज वेदक, किन्हळ शाळेतील कु. दिक्षा दिनेश येसवारे, विरसई शाळेतील कु. अक्षरा राजेंद्र पाटील, नवशी शाळेतील कु. प्रांजल चंद्रकांत खळे तसेच हर्णै शाळेतील कु. सृष्टी सुदर्शन कोठावळे या पाच विद्यार्थीनींची इस्रो दौऱ्यासाठी निवड झाली असून यानिमित्त पंचायत समिती दापोली येथे आयोजित केलेल्या विशेष अभिनंदन व शुभेच्छा कार्यक्रमात या सर्व विद्यार्थ्यांना इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पंचायत समिती दापोली सभापती उन्मेष राजे, गटविकास अधिकारी गणेश मंडलीक, पंचायत समितीचे माजी सभापती शांताराम पवार, गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे, शिक्षण विस्तार अधिकारी वलेले, शिक्षक मनोज वेदक, विनय राणे, दीपक जाधव, प्रज्ञा देघरकर, सायली तांबे, महेंद्र खांबल, प्रदीप गमरे आदी उपस्थित होते. इस्रो अभ्यास दौर्यासाठी रवाना होत असलेल्या या सर्व विद्यार्थ्यांचे दापोलीतून विशेष अभिनंदन होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













