दापोली : विजेचा पोल आणि झाड ‘दोरी’वर टिकले? दापोलीतील अजब दोरीमुळे नागरिक संभ्रमात, अपघाताची भीती

banner 468x60

दापोली शहरातील नर्सरीकडे जाणाऱ्या मुख्य रहदारीच्या रस्त्यावर एक अत्यंत अजब आणि तितकाच धोकादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला चक्क नायलॉनच्या दोरीने बांधण्यात आले असून, त्या दोरीचे दुसरे टोक रस्त्याच्या पलीकडील एका झाडाला घट्ट बांधण्यात आल्याचे दिसून आले आहे. या प्रकारामुळे नागरिक आणि वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे ही दोरी थेट रस्त्याच्या वरून ताणलेली असल्याने वाहनचालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. हा रस्ता कायम गजबजलेला असल्याने एखादा अपघात होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

या प्रकारामुळे परिसरात चर्चांना उधाण आले असून, “नेमकं पडतंय काय? झाड की पोल?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. काहींच्या मते झाड कोसळू नये म्हणून त्याला विजेच्या खांबाचा आधार देण्यात आला आहे, तर काहींना विजेचा पोल धोकादायक स्थितीत असल्याने झाडाचा आधार घेतल्याचा संशय आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नायलॉनची दोरी ही कायमस्वरूपी उपाययोजना नसून ती पाऊस, वारा किंवा उन्हामुळे कमकुवत होऊन कधीही तुटू शकते. अशा परिस्थितीत विजेचा खांब किंवा झाड रस्त्यावर कोसळल्यास मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या गंभीर प्रकाराकडे Maharashtra State Electricity Distribution Company Limited तसेच संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, धोकादायक तात्पुरती व्यवस्था हटवून सुरक्षित आणि कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी दापोलीकर नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *