दापोली तालुक्यात सलग चार दिवस वीजपुरवठा खंडित होत असून आज पुन्हा एकदा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. दापोलीला वीजपुरवठा करणाऱ्या दोन्ही मुख्य वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यामुळे मंगळवार, २६ मे रोजी रात्री बारा ते साडेबारा वाजेपर्यंत किमान दोन ते तीन तास वीजप्रवाह बंद राहणार असल्याची माहिती महावितरण कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दापोली तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः आंबा, काजू आणि इतर प्रक्रिया उद्योगांच्या हंगामात वीज खंडित होत असल्यामुळे उद्योगधंद्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. थंड साठवण, प्रक्रिया यंत्रणा आणि उत्पादन प्रक्रिया ठप्प होत असल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान वाढत आहे.
याचबरोबर पर्यटन हंगामातही या समस्येचा मोठा फटका बसत आहे. रिसॉर्ट, हॉटेल आणि होमस्टे व्यवसायिकांना पर्यटकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत असून, अनेक ठिकाणी पर्यटक आणि व्यावसायिकांमध्ये वाद निर्माण होत असल्याच्या घटनाही घडत आहेत. दुप्पट दराने वीज घेणाऱ्या व्यापाऱ्यांना माल खराब होऊन नुकसान सहन करावे लागत असल्याने “या नुकसान भरपाईला जबाबदार कोण?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दापोलीला वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिन्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. लोकप्रतिनिधी आणि संबंधित मंत्र्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पुन्हा एकदा अचानक वीज खंडित झाल्याने दापोलीकरांना उकाड्यात आणि काळोखात रात्र काढण्याची वेळ आली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













