दापोली : साखळोलीत ‘एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन’ प्रात्यक्षिक, कृषी संगिनी समूहाच्या उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

banner 468x60

दापोली | प्रतिनिधी (सागर गोवळे): ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी संगिनी समूहाच्या वतीने साखळोली नं. २ येथे शेतकऱ्यांसाठी ‘एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन’ (IPDM) या विषयावर विशेष प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण, उत्पादनवाढ आणि पर्यावरणपूरक शेतीविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रात्यक्षिकादरम्यान तज्ज्ञ मार्गदर्शक पी . डी. पोटफोडे यांनी IPDM तंत्रज्ञानाची सखोल माहिती देत पिकांवरील कीड व रोगांचे वेळेवर निरीक्षण, आर्थिक नुकसान पातळी (ETL) लक्षात घेऊन निर्णय घेणे, विविध प्रकारच्या सापळ्यांचा प्रभावी वापर, जैविक नियंत्रणाचा अवलंब तसेच आवश्यकतेनुसार रासायनिक कीटकनाशकांचा संतुलित वापर याबाबत मार्गदर्शन केले.

banner 728x90

यावेळी शेतकऱ्यांना पिकांची नियमित पाहणी करून सुरुवातीच्या अवस्थेतच कीड व रोगांची ओळख पटवून योग्य उपाययोजना करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच रासायनिक कीटकनाशकांचा अनावश्यक वापर टाळल्यास उत्पादन खर्चात बचत होण्याबरोबरच पर्यावरणाचे संरक्षण होते आणि दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते, असा संदेशही देण्यात आला.

कार्यक्रमास परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी प्रात्यक्षिकाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शेतीविषयक विविध प्रश्नांची तज्ज्ञांकडून उत्तरे जाणून घेतली. अशा प्रकारच्या मार्गदर्शनामुळे आधुनिक व शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब वाढून शेती उत्पादनात निश्चितच वाढ होईल, असा विश्वास उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *