दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथे अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. सोमवारी दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईत सुमारे ७ हजार ३२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित दुकानदाराविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गिम्हवणे येथील जिल्हा परिषद शाळेजवळ असलेल्या ‘श्री स्टोअर्स’ या दुकानात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्रीसाठी साठवणूक करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक आयुक्त संकेत कोणेरी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सोमवारी दुपारी दुकानावर छापा टाकला.
तपासणीदरम्यान दुकानात केसरयुक्त विमल पान मसाला, रजनीगंधा पान मसाला, आरएमडी पान मसाला आदी प्रतिबंधित तंबाखूयुक्त पदार्थांचा साठा आढळून आला. राज्य शासनाने हे पदार्थ मानवी आरोग्यास घातक असल्याने प्रतिबंधित केलेले आहेत. प्रशासनाने तत्काळ कारवाई करत सर्व साठा जप्त केला.
या कारवाईत एकूण ७ हजार ३२२ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी समीर दामोदर महाडिक (वय ५२, रा. गिम्हवणे) याच्याविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक आयुक्त संकेत कोणेरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संबंधित दुकानात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ तसेच नियम २०११ अंतर्गत प्रतिबंधित असलेल्या अन्नपदार्थांची विक्रीसाठी साठवणूक करण्यात आली होती. तसेच आरोपीकडे सदर तंबाखूजन्य पदार्थांचा साठा कोठून आणला, याबाबत विचारणा करण्यात आली असता समाधानकारक माहिती देण्यात आली नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
प्रतिबंधित असल्याची माहिती असूनही हे पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आल्याने संबंधितांवर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ आणि नियम २०११ मधील विविध तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय अन्न सुरक्षा आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाकडून जिल्ह्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













