ग्रामीण भागातील शाळांच्या दुरवस्थेबाबत अनेकदा चर्चा होत असते. मात्र, अशा परिस्थितीत शासनाची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेत गावकऱ्यांनी आणि माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेचे रूप पालटल्याचे प्रेरणादायी उदाहरण दापोली तालुक्यातील डौली गावात पाहायला मिळाले आहे. येथील ५५ वर्षे जुन्या जिल्हा परिषद मराठी शाळेची पुनर्बांधणी लोकसहभाग आणि श्रमदानाच्या माध्यमातून करण्यात आली असून, नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी नव्या वर्गखोल्यांमध्ये शिक्षण घेणार आहेत.

डौली येथील जिल्हा परिषद शाळा ही गावातील अनेक पिढ्यांचे शिक्षण घडवणारी संस्था आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शाळेची इमारत जीर्णावस्थेत गेली होती. छताची पडझड, भिंतींना पडलेले तडे आणि वर्गखोल्यांची ढासळलेली अवस्था यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर बनत होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत शिक्षक आणि विद्यार्थी शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवत होते.

शाळेची ही बिकट अवस्था शिक्षकांनी एका व्हॉट्सॲप समूहावर मांडली. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांचे लक्ष या समस्येकडे वेधले गेले. ज्या शाळेने त्यांना शिक्षणाची दिशा दिली, त्या ज्ञानमंदिराची झालेली दुरवस्था पाहून अनेक माजी विद्यार्थी भावूक झाले. शाळेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी त्यांनी एकत्र येत पुढाकार घेतला.

पुनर्बांधणीसाठी मोठ्या निधीची आवश्यकता असतानाही माजी विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने आर्थिक मदत केली. गावातील पालक आणि ग्रामस्थांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर अनेकांनी प्रत्यक्ष श्रमदान करून वर्गखोल्यांच्या उभारणीचे काम हाती घेतले. दिवसेंदिवस नव्या भिंती उभ्या राहत गेल्या आणि शाळेचे रूप बदलू लागले.
विशेष म्हणजे, या उपक्रमात सहभागी झालेल्या अनेक माजी विद्यार्थ्यांची मुले सध्या याच शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यामुळे ही केवळ इमारतीची पुनर्बांधणी नसून, आपल्या पुढील पिढीसाठी सुरक्षित आणि दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था उभारण्याचा सामूहिक प्रयत्न ठरला.
सध्या शाळेच्या इमारतीचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले असून अंतिम रंगरंगोटीचे काम सुरू आहे. येत्या १५ जूनपासून पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी नव्या आणि सुरक्षित वर्गखोल्यांमध्ये शिक्षण घेणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या उपक्रमाच्या यशामागे संपूर्ण गावाची एकजूट महत्त्वाची ठरली. सरपंच हरिश्चंद्र महाडीक, उपसरपंच अनंत महाडीक, तंटामुक्ती अध्यक्ष अनंत बाबू महाडिक, अंगणवाडी सेविका आर्वी महाडिक व शीतल गायकवाड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष गणपत जाधव, उपाध्यक्ष रुपेश मारुती महाडिक तसेच समिती सदस्यांनी मोलाचे योगदान दिले. शिक्षक विजय जाधव आणि मधुरा सोमण यांनीही सातत्याने पाठपुरावा करून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
डौली गावाने लोकसहभाग, श्रमदान आणि शिक्षणाप्रती असलेली बांधिलकी यांचा उत्कृष्ट संगम घडवत ग्रामीण भागासाठी एक आदर्श निर्माण केला आहे. शासनाच्या मदतीसोबतच समाज एकत्र आल्यास अशक्य वाटणारी कामेही यशस्वीपणे पूर्ण होऊ शकतात, हे डौली गावाने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













