दापोली तालुक्यातील आंजर्ले-मुर्डी जोडरस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, हा रस्ता आता वाहनचालकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. महावितरण कंपनीने विनापरवाना रस्त्याच्या मधोमध खोदकाम करून भूमिगत केबल टाकल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झाली आहे.

रस्ता तातडीने दुरुस्त करून मिळावा यासाठी दिव्यांग ग्रामस्थ मंगेश महाडिक यांनी ६ मार्च २०२६ रोजी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाने रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. तरीदेखील प्रत्यक्षात कोणतीही कामे झाली नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

यानंतर संतप्त ग्रामस्थांनी ८ मे २०२६ रोजी आंदोलन छेडले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ७ मे रोजी महावितरण अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन रस्ता तातडीने पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यानंतरही जिल्हा परिषद प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

जिल्हा परिषद अधिकारी गणेश पारधी यांनी संबंधित ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे तोंडी आश्वासन दिले होते. मात्र त्या संदर्भात कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

आंदोलनानंतर तब्बल दहा दिवसांनी रस्त्यावर केवळ सहा इंच खोदकाम करून त्यात जाड खडी व माती टाकण्यात आली. काही ठिकाणी फक्त मोठी खडी टाकून काम अर्धवट सोडण्यात आले आहे. त्यामुळे ही खडी रस्त्यावर पसरून अपघात होत असल्याची तक्रार वाहनचालकांकडून केली जात आहे.
या संदर्भात बुधवारी, २७ मे २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता आंजर्ले-मुर्डी ग्रामस्थांचे शिष्टमंडळ, संबंधित ठेकेदार आणि महावितरण अधिकारी यांची दापोली उपविभागीय कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र सायंकाळी ६ वाजूनही संबंधित अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांच्या वेळेचा अपव्यय होत असल्याचा आरोपही करण्यात आला.
“लवकरात लवकर रस्ता पूर्ण करावा, अन्यथा होणारी मनुष्यहानी, अपघात आणि पावसाळ्यात निर्माण होणारी बिकट परिस्थिती याला प्रशासन जबाबदार राहील,” असा इशारा आंजर्ले-मुर्डी ग्रामस्थांनी दिला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













