दापोली | प्रतिनिधी : सागर गोवळे
बोरिवली (आडीवाडी) : “मनात आणलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही” ही उक्ती केवळ बोलण्यापुरती मर्यादित न ठेवता दापोली तालुक्यातील बोरिवली (आडीवाडी) येथील ग्रामस्थांनी ती प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवली आहे. कोणत्याही शासकीय निधीची किंवा प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून गावातील महत्त्वाचे रस्ते स्वच्छ आणि सुस्थितीत करण्याची मोहीम यशस्वी केली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही बोरिवली (आडीवाडी) येथील ग्रामस्थांनी एकजुटीचे दर्शन घडवत रस्त्यालगत वाढलेली झाडी, झुडपे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या फांद्या हटवण्याचे काम हाती घेतले. या मोहिमेमुळे परिसरातील रस्त्यांना नवसंजीवनी मिळाली असून, वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्यास मदत झाली आहे.

दोन प्रमुख मार्गांवर श्रमदानाची मोहीम
ग्रामस्थांनी बोरिवली आडीवाडी ते पंचनदी तसेच बोरिवली आडीवाडी ते चिखलगाव या दोन्ही महत्त्वाच्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात सफाई मोहीम राबवली.

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेली दाट झाडी, एसटी बस आणि इतर वाहनांच्या वाहतुकीस अडथळा ठरणारी झुडपे तसेच वीज वाहिन्यांवर लटकणाऱ्या धोकादायक फांद्या हटवण्यात आल्या. अनेक ठिकाणी वाढलेल्या झाडीमुळे रस्त्याची रुंदी कमी झाल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. आता या श्रमदानामुळे रस्ते अधिक मोकळे आणि सुरक्षित झाले आहेत.
स्वतःचा खर्च, स्वतःची अवजारे आणि गावाची एकी!
या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या कामासाठी कोणत्याही शासकीय निधीचा आधार घेण्यात आलेला नाही. झाडी आणि धोकादायक फांद्या कापण्यासाठी आवश्यक असलेली अवजारे, कटर मशीन तसेच त्यासाठी लागणारे पेट्रोल-डिझेल यासह इतर सर्व खर्च ग्रामस्थांनी स्वतःच्या खिशातून केला.
गावाच्या हितासाठी प्रत्येकाने आपल्या परीने हातभार लावत हा उपक्रम यशस्वी केला. काही ग्रामस्थांनी प्रत्यक्ष श्रमदान केले, तर काहींनी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून दिली. सामूहिक सहभागातून पार पडलेल्या या उपक्रमाने गावातील एकजुटीचे एक उत्तम उदाहरण निर्माण केले आहे.
दरवर्षी जपली जाते श्रमदानाची परंपरा
विशेष म्हणजे हा उपक्रम केवळ यंदापुरता मर्यादित नसून बोरिवली (आडीवाडी) ग्रामस्थांनी अनेक वर्षांपासून ही परंपरा जपली आहे. दरवर्षी पावसाळ्यानंतर किंवा आवश्यकतेनुसार ग्रामस्थ एकत्र येऊन रस्त्यांची स्वच्छता, झाडी कटाई आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या बाबी दूर करण्याचे काम स्वतःहून करतात.
प्रशासनाकडे मागणी करून मदतीची प्रतीक्षा करत बसण्यापेक्षा ‘आपलं गाव, आपली जबाबदारी’ हे सूत्र प्रत्यक्षात आणण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. गावाच्या विकासासाठी प्रत्येकाने आपल्या परीने योगदान दिल्यास अनेक समस्या सहजपणे सोडवता येऊ शकतात, हा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला आहे.
छोटं गाव; मात्र विचारांची उंची मोठी!
बोरिवली (आडीवाडी) गावाचा आकार आणि लोकसंख्या कदाचित मर्यादित असेल, मात्र गावकऱ्यांची एकजूट, सामाजिक बांधिलकी आणि गावाच्या विकासासाठी काहीतरी करण्याची जिद्द मोठी आहे.
स्वतःच्या गावातील प्रश्न स्वतःच्या सहभागातून सोडवण्याचा हा आदर्श आजूबाजूच्या गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. सामूहिक श्रमदान आणि लोकसहभागाच्या माध्यमातून गावातील मूलभूत समस्या सोडवता येऊ शकतात, याचा वस्तुपाठ बोरिवली (आडीवाडी) ग्रामस्थांनी घालून दिला आहे.
आजच्या काळात छोट्या-छोट्या कामांसाठीही केवळ प्रशासनावर अवलंबून राहण्याची प्रवृत्ती वाढत असताना, बोरिवली (आडीवाडी) ग्रामस्थांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारून एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













