दाभोळ : वणौशीत ‘कृषी स्नेही’ विद्यार्थ्यांचा पुढाकार, आधुनिक भात लागवड तंत्राचे शास्त्रशुद्ध प्रात्यक्षिक

banner 468x60

प्रतिनिधी – सागर गोवळे

वाढते उत्पादन, कमी खर्च आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ‘कृषी स्नेही’ रावे गटाने वणौशी येथे भात लागवडीच्या सुधारित पद्धतीचे प्रात्यक्षिक आयोजित केले. वणौशी येथील वडवाडी परिसरातील शेतकरी संतोष घाग यांच्या शेतात झालेल्या या प्रात्यक्षिकाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

banner 728x90

कार्यक्रमात कृषी कन्या नीलम मदने यांनी भात लागवडीच्या शास्त्रशुद्ध आणि सुधारित पद्धतींचे सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, २० × १५ सें.मी. अंतर आणि २.५ ते ३.५ सें.मी. खोलीवर रोपांची लागवड केल्यास पिकाची वाढ अधिक चांगली होते. तसेच समान अंतर राखण्यासाठी दोरीचा वापर केल्यास रोपांची योग्य वाढ, अधिक फुटवे, तणांचे प्रभावी नियंत्रण आणि खत व पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन करणे सोपे होते. परिणामी उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळते.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या विविध शेतीविषयक प्रश्नांचे समाधान करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती अधिक फायदेशीर आणि उत्पादनक्षम कशी करता येईल, याबाबत विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना सुधारित भात लागवडीचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले.

या प्रात्यक्षिकाच्या यशस्वी आयोजनासाठी रावे गटातील नीलम मदने, तन्वी नादिवडेकर, श्रुती बोबडे, साक्षी लोके, सलोनी सावंत, श्रावणी मोरे, अंकिता मुंज, आकांक्षा गाडगे, कोमल झिरवाळ आणि समृद्धी जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

हा उपक्रम विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे समन्वयक डॉ. अशोक चव्हाण आणि केंद्रप्रमुख डॉ. विजय देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. तसेच विषय विशेषज्ञ डॉ. वीरेश चव्हाण, डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उपक्रम अधिक प्रभावी केला.

‘कृषी स्नेही’ रावे गटाच्या या उपक्रमाचे परिसरातील शेतकऱ्यांनी स्वागत करत विद्यार्थ्यांच्या पुढाकाराचे कौतुक केले. आधुनिक आणि शास्त्रशुद्ध शेती पद्धतींचा प्रसार करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मतही यावेळी अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *