दापोली, दि. २ जुलै : दापोली कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थिनींच्या ‘कृषीस्नेही’ गटाने ‘रावे’ (RAWE) उपक्रमांतर्गत भिवबंदर (ता. दापोली) येथे शेतकऱ्यांशी संवाद साधत आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती दिली. या उपक्रमातून आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांच्या पारंपरिक अनुभवांची प्रभावी देवाणघेवाण झाली.

भिवबंदरचे अध्यक्ष दत्तप्रसाद मोरे यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात परिसरातील अनेक प्रगतशील शेतकरी सहभागी झाले होते. ‘कृषीस्नेही’ गटातील विद्यार्थिनींनी बियाण्यांची निवड, खरेदी करताना घ्यावयाची काळजी, बियाण्यांवरील टॅगचे महत्त्व तसेच दर्जेदार बियाण्यांची ओळख याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी आंबा, काजू, नारळ, सुपारी आणि मसाला पिकांचे पीक व्यवस्थापन, खतांचे योग्य नियोजन, आंबा बागांमध्ये पॅक्लोब्युट्राझोलचा शास्त्रोक्त वापर, झाडांची छाटणी तसेच जुन्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन यासंदर्भातही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शासकीय मान्यताप्राप्त रोपवाटिकांमधूनच दर्जेदार रोपे खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या पारंपरिक शेतीतील अनुभव आणि अडचणी विद्यार्थिनींसमोर मांडल्या. विद्यार्थिनींनी विविध शंकांचे निरसन करत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. त्यामुळे हा संवाद शेतकरी आणि कृषी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरला.
या उपक्रमात सलोनी सावंत, समृद्धी जाधव, श्रावणी मोरे, साक्षी लोके, अंकिता मुंज, श्रुती बोबडे, तन्वी नादिवडेकर, कोमल झिरवाल, आकांक्षा गाडगे आणि निलम मदने या कृषीकन्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
हा कार्यक्रम कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषय विशेषज्ञ डॉ. एम. जी. पालशेतकर व डॉ. रणजीत महाडिक, तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













