दापोली नगरपंचायत हद्दीतील ‘आपना नगर’ येथील पादचारी साकव (पूल) सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत असून, तो केव्हाही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असल्याने स्थानिक नागरिक कुतबुद्दीन अली बर्डे यांनी नगरपंचायत प्रशासनाकडे या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
सुमारे १५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला हा लोखंडी साकव परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या पुलावरून दररोज मोठ्या प्रमाणात पादचाऱ्यांची ये-जा सुरू असते. तसेच जवळच मदरसा असल्याने लहान मुलांचीही मोठी वर्दळ असते. मात्र, सध्या पुलाची अवस्था अत्यंत खराब झाली असून, दोन्ही बाजूंचे भाग तुटले आहेत. तसेच पायाखालचे पत्रेही जीर्ण झाल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
नागरिकांनी लोकवर्गणीतून केली होती दुरुस्ती
या पुलाच्या दुरवस्थेबाबत स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही नगरपंचायतीकडे निवेदन देऊन दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अखेर नागरिकांनी लोकवर्गणी जमा करून पुलाची काही प्रमाणात दुरुस्ती स्वतः केली होती. परंतु आता हा साकव पुन्हा पूर्णपणे मोडकळीस आला असून, मोठी दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नगरपंचायत प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी
कुतबुद्दीन अली बर्डे यांनी पुलाची छायाचित्रे जोडून नगरपंचायत प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने दुरुस्तीची कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती स्थानिक नगरसेविकांनाही देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या धोकादायक पुलाबाबत नगरपंचायत प्रशासन कोणती भूमिका घेते आणि किती लवकर उपाययोजना करते, याकडे ‘आपना नगर’ परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













