चिपळूण : मुकुंद पालांडे आत्महत्या प्रकरणात फरार दोघांचा शोध सुरू, चार आरोपी न्यायालयीन कोठडीत

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील अलोरे येथील रहिवासी आणि बँकेत कार्यरत असलेले मुकुंद मुरलीधर पालांडे यांच्या आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला असताना, या प्रकरणातील फरार धनंजय शेट्ये आणि आशिष सावंत यांचा अलोरे-शिरगाव पोलिसांकडून युद्धपातळीवर शोध सुरू आहे. या दोघांना अटक करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली असून विविध ठिकाणी छापेमारी आणि चौकशी मोहीम राबवण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे.

banner 728x90

या प्रकरणात मुकुंद पालांडे यांना संगनमताने धमक्या देणे, दमदाटी करणे, मारहाण करण्याचा प्रयत्न करणे तसेच पैशांची मागणी करून त्यांच्यावर मानसिक दबाव निर्माण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या सततच्या त्रासामुळेच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये अनोखी अखिलेश खेडेकर, अखिलेश खेडेकर, योगेश मोरे आणि वेदांत विजय टाकळे यांचा समावेश आहे. या चौघांना यापूर्वी न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मंगळवारी त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण देणारे महत्त्वाचे पुरावे मुकुंद पालांडे यांनी बेपत्ता होण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चार पानी पत्रातून समोर आले आहेत. या पत्रात त्यांनी आपल्या मृत्यूसाठी संबंधित सहा जणांना थेट जबाबदार धरल्याचे नमूद केले होते. या पत्रामुळे पोलिस तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.

मुकुंद यांचे वडील मुरलीधर पालांडे यांनी या पत्राच्या आधारे अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत चौघांना ताब्यात घेतले आणि गुन्ह्याचा तपास सुरू केला.

सध्या पोलिसांचे मुख्य लक्ष फरार आरोपी धनंजय शेट्ये आणि आशिष सावंत यांना अटक करण्यावर असून, त्यांच्या मोबाईल लोकेशनसह विविध तांत्रिक बाबींच्या आधारे शोधमोहीम सुरू आहे. या दोघांच्या अटकेनंतर या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *