चिपळूण : दीड महिन्यांपासून फरार असलेला गुटखा किंग अखेर जेरबंद, संगमेश्वर पोलिसांची चिपळूणमध्ये धडाकेबाज कारवाई

banner 468x60

गेल्या दीड महिन्यांपासून पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकत फरार असलेल्या सराईत अवैध गुटखा व्यावसायिकाला अखेर संगमेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. चिपळूण परिसरात लपून बसलेल्या मुख्य आरोपीला शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतल्याने पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईची जिल्हाभर चर्चा सुरू आहे.

banner 728x90

या प्रकरणाची सुरुवात २६ मे २०२६ रोजी झाली होती. संगमेश्वर येथील पारेख पेट्रोल पंपाजवळ संशयास्पदरीत्या उभी असलेली वॅगनार कार (एमएच-१४ बीके-४१२०) असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, कारमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला मोठ्या प्रमाणातील गुटखा असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, वाहनात तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाने कार जागेवरच सोडून अंधाराचा फायदा घेत पलायन केले होते.

यानंतर अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलिसांनी संयुक्त तपासणी केली असता कारमधून तब्बल ५ लाख ४६ हजार ६०० रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला.

या प्रकरणी कार मालक फारुक कच्ची (रा. आंबेड खुर्द, ता. संगमेश्वर) आणि मोहम्मद यासिन उमर फारुक पठाण (रा. मुचरी, ता. संगमेश्वर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा कायद्यान्वये संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. पोलिसांचा माग काढण्यासाठी ते सतत ठिकाणे बदलत असल्याने त्यांचा शोध घेणे आव्हानात्मक ठरत होते.

मात्र संगमेश्वर पोलिसांनी गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. अखेर ९ जुलै २०२६ रोजी मुख्य आरोपी फारुक अल्लारखॉ कच्ची हा चिपळूण परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने तातडीने कारवाई करत त्याला वेढा घालून अटक केली. दीड महिन्यांपासून सुरू असलेला लपंडाव अशा प्रकारे संपुष्टात आला.

ही कारवाई रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या देखरेखीखाली पार पडली. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, पोहेकॉ मनवल आणि पोलीस कॉन्स्टेबल आटोळे यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वी केली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई करत असून, संगमेश्वर पोलिसांच्या या कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *