Breaking News
दापोलीतील विद्यार्थ्यांनी पोक्सो अंतर्गत आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करण्याची केली मागणी, महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलिसांना निवेदन दापोलीकर सायकलप्रेमींची पंढरपूर सायकल वारी उत्साहात संपन्न, 300 हून अधिक किमीचा सायकल प्रवास करत विठुरायाच्या चरणी नतमस्तक चिपळूण : लावणीसाठी लवकर उठण्याच्या वादातून सुनेकडून 71 वर्षीय सासूला मारहाण; चिपळूणमध्ये गुन्हा दाखल रत्नागिरी : पेन्शन कार्ड अपडेटच्या बहाण्याने 83 वर्षीय ज्येष्ठाची 1.68 लाखांची ऑनलाइन फसवणूक खेड : गोटलवाडीत भूस्खलनाच्या धोक्याची गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून पाहणी 19 कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर, मृतांच्या वारसांना 8 लाख, तर घरबांधणीसाठी 2 लाख 60 हजारांची मदत

चिपळूण : 400 वर्षे जुन्या पालांडे परिवाराच्या समाधीस्थळाची तोडफोड प्रकरणी 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

banner 468x60

चिपळूण नागावे येथील सुकाई मंदिरासमोरील पालांडे परिवाराच्या सुमारे ४०० वर्षे जुन्या परंपरागत दफनभूमी व समाधीस्थळाच्या कथित तोडफोडप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलिसांनी १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

banner 728x90

विशेष म्हणजे या प्रकरणात धार्मिक स्थळाचे नुकसान, धार्मिक भावना दुखावणे, दफनभूमीची विटंबना तसेच मालमत्तेची तोडफोड यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या कलमांचा समावेश करण्यात आल्याने या प्रकरणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

नागावे पालांडेवाडी येथील शिवाजी दत्ताराम पालांडे यांनी २३ जानेवारी २०२६ रोजी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, सर्व्हे क्रमांक ३५, हिस्सा क्रमांक १९ मधील जागेवर पालांडे परिवाराची अनेक पिढ्यांपासून परंपरागत दफनभूमी आणि समाधीस्थळ अस्तित्वात आहे. या ठिकाणाला ऐतिहासिक, धार्मिक आणि कौटुंबिक वारशाचे महत्त्व असून, काही व्यक्तींनी यंत्रसामग्रीच्या सहाय्याने या समाधीस्थळाची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला होता.

तक्रारीची सखोल चौकशी, कागदपत्रांची पडताळणी आणि घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी ११ जुलै २०२६ रोजी प्रकाश पुतळाजी शिंदे, प्रकाश बाबू चिपळूणकर, विष्णू भीमाजी साळवी, सुरेश बाबू साळवी, सुशांत श्रीधर साळवी, सुरेश नारायण साळवी, संजय अनंत झगडे, दीपक विठ्ठल साळवी, रामचंद्र कृष्णा वीर, दत्ताराम कृष्णा वीर, अनंत भीमाजी साळवी, महादेव गणपत साळवी, दीपक यशवंत चिपळूणकर, संभाजी पांडुरंग बगडे, मंगेश मनोहर निगडे तसेच जेसीबी आणि ट्रॅक्टरचे चालक व मालक अशा एकूण १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम २९८, २९९, ३०१, ३२४(२) आणि ३२९(३) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. धार्मिक स्थळाचे नुकसान करणे, धार्मिक भावना दुखावणे, दफनभूमी अथवा समाधीस्थळाची विटंबना करणे आणि मालमत्तेची तोडफोड करणे यांसारख्या आरोपांचा या गुन्ह्यात समावेश आहे.

दरम्यान, पालांडे परिवाराचा दावा आहे की हे समाधीस्थळ सुमारे चारशे वर्षांपासून अस्तित्वात असून ते त्यांच्या पूर्वजांच्या स्मृतींशी आणि गावाच्या इतिहासाशी निगडित आहे. त्यामुळे या ठिकाणाच्या कथित तोडफोडीमुळे कुटुंबीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर नागावे परिसरात वारसाहक्क, धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

या प्रकरणात पालांडे कुटुंबीयांना अॅड. सुधीर बुटाला आणि अॅड. समीर शेठ हे कायदेशीर मार्गदर्शन करीत आहेत. पुढील तपास अलोरे-शिरगाव पोलीस करीत असून, तपासादरम्यान आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *