चिपळूण आंबडस ते चोरवणे मार्गावर दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चालक, वाहकांसह तब्बल २७ प्रवासी जखमी झाले. ही घटना शनिवार, २९ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास खांदाट गवळवाडी फाट्याजवळ, रविंद्र सकपाळ यांच्या घराजवळ घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नागेश रामचंद्र कदम (वय ५१, रा. माखजन, बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) हे एसटी बस क्रमांक MH-20-BL-4034 घेऊन चिपळूणहून चोरवणेकडे जात होते. त्याचवेळी आरोपी चालक राहुल लक्ष्मण पवार (वय ३८, सध्या रा. एसटी डेपो, चिपळूण; मूळ रा. आसनगाव, ता. जि. सातारा) हा MH-14-BT-2674 क्रमांकाची एसटी बस कासईहून चिपळूणच्या दिशेने घेऊन जात होता.
खांदाट गवळवाडी फाट्याजवळ दोन्ही बस समोरासमोर आल्या असता आरोपी चालकाने बस अतिवेगाने व रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता चालवल्याने त्याची बस समोरून येणाऱ्या एसटी बसला धडकली. या अपघातात दोन्ही बसमधील चालक, वाहक आणि प्रवाशांना लहान-मोठ्या तसेच काही गंभीर दुखापती झाल्या. तसेच दोन्ही एसटी बसचे नुकसान झाले.
अपघातातील जखमींमध्ये एसटी चालक नागेश कदम, वाहक संजय आडे व विकास रगड यांच्यासह सवर्णा चव्हाण, मनोहर चव्हाण, मनिषा लाड, सनिता सनगरे, सोनल खेतले, सुजाता धनावडे, विजया जंगम, विठ्ठल धाडवे, तकाराम हिरवे, पार्थ नांदगावकर, संतोष कदम, मकंद पालांडे, श्रती जंगम, जानकी गोरखे, अनंत उत्तेकर, सहासिनी शिंदे, वृषाली तांबे, सुनंदा कदम, जयवंत पालांडे, सीयान कदम, विद्या भवड, नितेश धाडवे, निधी धाडवे आणि ओम शिंदे यांचा समावेश आहे.
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











