चिपळूण : चिवेलीतील पेयजल योजनेत 33 लाखांच्या कथित अपहारप्रकरणी प्रशासनाला ग्रामस्थांचा जाब

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील चिवेली येथील राष्ट्रीय पेयजल योजनेत झालेल्या तब्बल ३३ लाख रुपयांच्या कथित अपहारप्रकरणी विभागीय कोकण आयुक्तांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट आदेश देऊन महिनाभराचा कालावधी उलटला, तरी प्रशासनाकडून अद्याप कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर संतप्त चिवेली ग्रामस्थांनी थेट चिपळूण पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागावर धडक देत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर येत्या दहा दिवसांत संबंधितांवर गुन्हे दाखल करून कारवाई पूर्ण करण्याचे आश्वासन उपअभियंत्यांनी दिले.

माहिती अधिकार कार्यकर्ते विद्याधर साळुंखे यांनी चिवेलीतील राष्ट्रीय पेयजल योजनेतील कथित अनियमिततेबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर झालेल्या दोन स्वतंत्र चौकशांमध्ये प्रत्यक्ष कामे न करता संबंधित ठेकेदाराला सुमारे ३३ लाख रुपयांची रक्कम अदा केल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

या प्रकरणावर जिल्हा परिषद तसेच कोकण भवन स्तरावर वेळोवेळी सविस्तर सुनावणी झाली. त्यानंतर विभागीय कोकण आयुक्तांनी प्रकरणाची चौकशी व उपलब्ध निष्कर्षांच्या आधारे संबंधितांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. तसेच कथित अपहाराची रक्कम दोषींकडून वसूल करण्याच्या सूचनाही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

मात्र, आदेश होऊनही महिनाभर कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आदेशाची अंमलबजावणी नेमकी का रखडली, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास विलंब का झाला आणि कथित आर्थिक अनियमिततेची रक्कम वसुलीसाठी कोणती पावले उचलण्यात आली, याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.

दरम्यान, ग्रामस्थांच्या दबावानंतर पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांनी येत्या दहा दिवसांत संबंधितांवर गुन्हे दाखल करून पुढील कारवाई पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता प्रशासन या आश्वासनाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करते का, याकडे चिवेली ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *