चिपळूण शहरातील गोपाळकृष्णवाडी परिसरातील मधुबन पार्क येथे बंद फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ४ लाख १५ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि मौल्यवान वस्तूंवर हात साफ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
याबाबत सागर पाटील यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाळकृष्णवाडी येथील मधुबन पार्क इमारतीमधील फ्लॅट क्रमांक २०७ मध्ये सागर पाटील यांचे निवासस्थान आहे. काही कारणास्तव १२ मे ते १९ मे २०२६ या कालावधीत त्यांचा फ्लॅट बंद होता. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तसेच कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.
घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी थेट बेडरूममधील लोखंडी कपाट गाठले. कपाटाचे लॉकर तोडून त्यामधील सोन्याचे लहान मंगळसूत्र, सोन्याची चैन, विविध अंगठ्या, लहान बाळाच्या सोन्याच्या अंगठ्या व बांगड्या, सोन्याचे कॉईन तसेच चांदीची समई, चांदीची भांडी आणि कुबेराची मूर्ती असा एकूण ४ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
१९ मे रोजी घरमालक फ्लॅटवर परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले पाहून त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













