मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथील सप्तालिंगी पुलाजवळ वॅगनआर कारचा अपघात झाला. मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने येणारी कार डोंगरावर आदळून महामार्गावर पलटी झाली. या अपघातात डोंबिवली येथील दोन तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुजित लोखंडे (वय २५) आणि सचिन गव्हारे (वय २४), दोघेही डोंबिवली येथील रहिवासी असून, ते वॅगनआर कार (क्रमांक MH 01 CR 5250) मधून मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने प्रवास करत होते. शुक्रवार सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास त्यांची कार संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथील सप्तालिंगी पुलाजवळ आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

नियंत्रण सुटलेली कार रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगरावर जोरात आदळली आणि त्यानंतर महामार्गावरच पलटी झाली. धडक इतकी जोरदार होती की कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
या अपघातात कारमधील दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. दोघेही बेशुद्धावस्थेत असल्याने अपघाताच्या वेळी कार कोण चालवत होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र चिपळूणचे पोलीस उपनिरीक्षक बेग, पोलीस हवालदार शिंदे आणि पोलीस कॉन्स्टेबल राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही जखमींना कारमधून बाहेर काढले आणि तातडीने रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, अपघातग्रस्त कारमुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिसांनी कार रस्त्याच्या बाजूला हलवून वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असून, संगमेश्वर पोलीस पुढील तपास करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













