रत्नागिरी : येथे कोयत्याने सपासप वार करून तरुणाची हत्या

banner 468x60

रत्नागिरी शहरालगतच्या कुवारबाव परिसरात घडलेल्या एका थरारक आणि निर्घृण हत्येने संपूर्ण शहर हादरले आहे. साईनगर येथील सात बंगल्याच्या मागील भागात एका २५ वर्षीय तरुणावर कोयत्याने सपासप वार करून त्याची हत्या करण्यात आली.

banner 728x90

गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सूरज राजाराम झोरे (वय २५, मूळ रा. नायरी, ता. संगमेश्वर, सध्या रा. विरार, मुंबई) असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवार, २१ मे रोजी रात्री सुमारे ९:३० ते १०:५३ च्या दरम्यान ही रक्तरंजित घटना घडली.


घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली आणि अवघ्या काही तासांत तीन संशयितांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे कुवारबाव परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या सोहम एकनाथ म्हात्रे, अभिषेक देवानंद राठोड आणि नजीबूल शेख ऊर्फ सोनू यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.


या तिघांचे संपूर्ण पत्ते अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून त्याबाबत माहिती गोळा करण्यात येत आहे. तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या भूमिकेचा तपास सुरू आहे.
या प्रकरणी मृत सूरजची बहीण नंदा रमेश फाले (वय ३२, रा. राजेंद्र कॉम्प्लेक्स, तिरुपती बिल्डिंग, दहिसर, मुंबई) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दाखल केली आहे.


तक्रारीनुसार, सूरज हा काही कामानिमित्त रत्नागिरी येथे आला होता. गुरुवारी रात्री तो साईनगर परिसरात असताना संशयित तिघांनी मिळून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. हा हल्ला पूर्ववैमनस्य, जुन्या वादातून किंवा अन्य कोणत्या कारणातून झाला का, याचा तपास सध्या सुरू आहे.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, संशयितांनी सूरजवर कोयत्याने अत्यंत क्रूरपणे हल्ला केला. त्याच्या मानेवर तसेच हातांवर सपासप वार करण्यात आले. अचानक झालेल्या या हल्ल्यात सूरज गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.


घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी आणि स्थानिकांनी तत्काळ धाव घेत त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले. त्याला अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करून उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने आणि जखमा गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराचा पंचनामा केला असून, घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यात आले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली जात आहे.


हल्ल्यानंतर संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत असून, पोलिसांनी वेगाने कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले.
या हत्येमागे नेमके कारण काय होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून विविध शक्यतांवर तपास सुरू आहे.
या सर्व बाबींची चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.


या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. संशयितांकडून सखोल चौकशी केली जात असून, हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र, घटनेपूर्वीच्या हालचाली आणि मृत सूरजचा संशयितांशी असलेला संबंध याबाबत तपास सुरू आहे.
दरम्यान, भरवस्तीत घडलेल्या या निर्घृण खुनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहर परिसरात वाढत्या गुन्हेगारी घटनांबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात असून, पोलिसांनी अशा घटनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *