चिपळूण: गोवळकोट येथे गांजा सेवन करणाऱ्या तरुणावर कारवाई

banner 468x60

चिपळूण शहरात अंमली पदार्थांविरोधी पोलिसांनी आपली मोहीम तीव्र केली असून, गोवळकोट रोडवरील पालोजी बाग परिसरात गांजाचे सेवन करणाऱ्या एका २७ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. २२ मार्च रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल शैलेश शांताराम वांगे यांनी फिर्याद दिली असून, आरोपी सतगुरु नरसिंग (वय २७, रा. पालोजी बाग, गोवळकोट रोड, चिपळूण) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी हा सार्वजनिक ठिकाणी बसून बेकायदेशीररित्या गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करत असताना पोलिसांना रंगेहात आढळून आला.


या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act) १९८५ च्या कलम ८(क) आणि २७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईची नोंद त्याच दिवशी रात्री ११ वाजेच्या सुमारास चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली.

शहरात अंमली पदार्थांचा विळखा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही महत्त्वाची कारवाई केली असून, अशा प्रकारे व्यसनाच्या आहारी जाणाऱ्या आणि बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *