मंडणगड : हॉटेलमध्ये काम करताना जिन्यावरून पडलेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

banner 468x60

हॉटेलमध्ये काम करत असताना जिन्यावरून पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या ४५ वर्षीय कामगाराचा मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.२५ वाजता घडली.

मयताचे नाव राजेश बबन तांबे (वय ४५, रा. वलोते, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश तांबे हे मागील चार वर्षांपासून मंडणगड येथील शिगवण ढाबा येथे काम करत होते. १ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये काम करत असताना त्यांचा जिन्यावरून पाय घसरला. यावेळी ते खाली पडल्याने त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाली आणि ते बेशुद्ध झाले.

हॉटेलचे मालक वल्लभ शिगवण यांनी त्यांना तातडीने डेरवण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे सीटी स्कॅन केल्यानंतर त्यांच्या डोक्यात रक्ताच्या गाठी झाल्याचे निदर्शनास आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिल्यानंतर २ सप्टेंबर रोजी सकाळी ६.२३ वाजता त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

केईएम रुग्णालयात त्यांच्या डोक्यातील रक्ताच्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र उपचार सुरू असतानाच ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.२५ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची नोंद मंडणगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १७/२०२६, बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *