रत्नागिरी : आरे-वारे समुद्रात एकाच कुटुंबातील चौघेजण बुडाले, तिघांना वाचवण्यात यश, एकाचा मृत्यू

banner 468x60

देवदर्शनासह सुट्टीतील मौज-मजा करण्यासाठी आरे-वारेसमुद्रकिनारी आलेल्या रत्नागिरीतील गाडेकर कुटुंबीयातील चौघेजण समुद्रात बुडाल्याची घटना समोर आलीय.

त्यातील तिघांना वाचवण्यात स्थानिकांसह नातेवाईकांना यश आले असून, पंकज रामा गाडेकर (वय 33 राहणार पुणे, मूळ कारवांचीवाडी रत्नागिरी) यांचा बुडून मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी 6:30 वाजता ही घटना घडली.

नोकरीनिमित्त पुणे येथे स्थायिक असलेले पंकज रामा गाडेकर हे पत्नी मयुरी गाडेकर यांच्यासह रत्नागिरीतील कारवांचीवाडी येथील आपल्या गावी सुट्टीसाठी आले होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गाडेकर कुटुंब रविवारी दुपारी संकष्टी चतुर्थी निमित्त गणपतीपुळे येथे विघ्नहर्त्याच्या दर्शनासाठी गेले होते. विघ्नहर्त्याचे दर्शन घेतले.

गणपतीपुळे येथे न जाता गाडेकर कुटुंबीय आरे- वारे समुद्र किनारी गेले होते. संध्याकाळी 5:30 वाजता गाडेकर कुटुंबीयातील पंकज रामा गाडेकर, मयुरी पंकज गाडेकर, बालाजी रामा गाडेकर व त्यांचा एक भाचा असे चौघेजण पोहण्यासाठी समुद्रात उतरले.

कमी पाण्यात मौज- मजा सुरू असतानाच अचानक आलेल्या लाटेने पंकज गाडेकर लाटे बरोबर आत ओढले गेले. लाटे बरोबर ते आत जात असल्याचे लक्ष येताच त्यांची पत्नी मयुरी व भाऊ बालाजी हे त्यांना वाचवण्यासाठी पुढे गेले. यावेळी तेही पाण्यात बुडू लागले.

यावेळी किनाऱ्यावर असलेल्या व त्यांच्यासमवेत आलेल्या मुले, महिलांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत चौघांनाही पाण्याबाहेर काढले. परंतु पंकज गाडेकर हे खोल पाण्यात बुडाले असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती.

स्थानिकांनी तात्काळ 108 रुग्णवाहिकेला संपर्क केला, परंतु 108 रुग्णवाहीका तासाभराने घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर चौघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालय आणण्यात आले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर पंकज रामा गाडेकर यांना मृत घोषित करण्यात आले.या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, पोलिस अंमलदार जोशी, शिवगण यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर रात्री उशिरा आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याचे काम ग्रामीण पोलीस स्थानकात सुरू होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *