बालविवाहाच्या प्रथेला आळा घालून रत्नागिरी जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. १८ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘बालहक्क सप्ताह व बालविवाह निर्मूलन विशेष जनजागृती मोहीम’ आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून बालविवाहाचे दुष्परिणाम, कायदेशीर तरतुदी आणि बालकांच्या हक्कांबाबत नागरिकांमध्ये जागृती केली जात आहे.

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्ड हेल्पलाइन यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविकांच्या जनजागृती रॅलीने या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समृद्धी वीर, कायदा व परिविक्षा अधिकारी संकेत मयेकर आणि पर्यवेक्षिका कल्पना आंबवले उपस्थित होते.
२७ नोव्हेंबर या आंतरराष्ट्रीय बालविवाह निर्मूलन दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जनजागृती रॅली, पथनाट्य, शाळा-महाविद्यालयांमधील मार्गदर्शनपर कार्यक्रम आणि विविध समुदायांमध्ये जनजागृतीचा समावेश आहे.

२० नोव्हेंबर रोजी माने इंटरनॅशनल स्कूल, गोविंद गंगाधर पटवर्धन स्कूल (जीजीपीएस) आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे विशेष कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमांत बालविवाहामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम, बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी तसेच बालकांचे हक्क आणि सुरक्षितता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
याशिवाय चाइल्ड हेल्पलाइन १०९८ द्वारे संकटग्रस्त बालकांना मिळणारी मदत, सखी वन स्टॉप सेंटरच्या सेवा आणि महिला व बाल विकास विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहितीही नागरिकांना देण्यात येत आहे.
बालविवाह रोखणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून पालक, शिक्षक, ग्रामपंचायत आणि समाजातील प्रत्येक नागरिकाने त्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. परिसरात बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तातडीने १०९८ या चाइल्ड हेल्पलाइन क्रमांकावर किंवा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
३० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या मोहिमेतून बालविवाहमुक्त रत्नागिरीचा संकल्प प्रत्यक्षात आणण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













