दापोली : सायकल चालवण्याचे आरोग्यदायी फायदे लक्षात घेता सायकल संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, नागरिकांमध्ये सायकलिंगची आवड निर्माण व्हावी आणि पर्यावरणपूरक वाहतुकीचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने दापोली सायकलिंग क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘दापोली विंटर सायक्लोथॉन २०२६’ स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी या स्पर्धेचे दहावे पर्व अर्थात सीझन १० यशस्वीरीत्या संपन्न झाले. या स्पर्धेत मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सातारा यांसह राज्याच्या विविध भागांतून आलेल्या १० ते ७५ वयोगटातील तब्बल १४० सायकलस्वारांनी सहभाग नोंदवला.

या सायक्लोथॉनचा शुभारंभ ७५ वर्षीय ज्येष्ठ सायकलस्वार गजानन भाताडे (रत्नागिरी), विविध सायकल मोहिमा पूर्ण केलेल्या कल्याणी तुळपुळे (पुणे) आणि सुनील रिसबूड (दापोली) यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला. वेगवेगळ्या वयोगटांतील सायकलस्वारांचा उत्साह यावेळी पाहायला मिळाला. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांनीच या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

या स्पर्धेत ५० किलोमीटर आणि ३० किलोमीटर अशा दोन अंतरांच्या गटांचा समावेश होता. कोकणच्या निसर्गरम्य किनारपट्टीवरून जाणारा मार्ग हे या सायक्लोथॉनचे प्रमुख आकर्षण ठरले. दापोली, बुरोंडी, करजगाव, लाडघर, कर्दे, मुरुड, सालदुरे, पाळंदे, हर्णै आणि आसूद या परिसरातून सायकलस्वारांनी आपली राईड पूर्ण केली. या प्रवासादरम्यान समुद्रकिनारे, निसर्गरम्य परिसर आणि कोकणातील पर्यटनस्थळांचा आनंद घेत स्पर्धकांनी सायकलिंगचा अनुभव घेतला.

सायक्लोथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी केवळ सायकलिंगपुरते स्वतःला मर्यादित न ठेवता दापोली परिसरातील पर्यटनाचाही आनंद घेतला. मार्गावरील विविध पर्यटनस्थळांना भेटी देत अनेकांनी कोकणी खाद्यपदार्थ, मासे यांचा आस्वाद घेतला. तसेच स्थानिक उत्पादनांची खरेदीही केली. विशेष म्हणजे काही स्पर्धक आपल्या कुटुंबीयांसह दोन ते सात दिवस दापोलीत मुक्कामासाठी आले होते. त्यामुळे या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक पर्यटनाला आणि व्यवसायालाही चालना मिळाली.
या सायक्लोथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी काही सायकलस्वारांनी तर लांबचा प्रवासही सायकलवरूनच केला. मुंबईहून जितेंद्र यादव, अनिल वेल्लमपती आणि अतुल ओझा यांनी मुंबई ते दापोली असा सायकल प्रवास करून स्पर्धेत सहभाग घेतला. तर विद्याधर पालकर यांनी पुणे ते दापोली असा सायकल प्रवास केला. या सायकलस्वारांच्या सहभागामुळे स्पर्धेतील उत्साह अधिकच वाढला.
या स्पर्धेत ज्येष्ठ सायकलस्वारांनीही आपली सायकलिंगची जिद्द दाखवून दिली. रत्नागिरीचे ७५ वर्षीय गजानन भाताडे, मुंबईचे ६४ वर्षीय अतुल ओझा, दौंडचे शरद कुलकर्णी, पुण्याचे अनिल धामणे, मुंबईचे विठोबा चव्हाण, नितीन बर्वे आणि सुनील खरात यांच्यासह ५८ ते ६० वयोगटातील अनेक सायकलस्वारांनी ही सायक्लोथॉन यशस्वीरीत्या पूर्ण केली. वय हा सायकलिंगमधील अडथळा नसल्याचे या ज्येष्ठ रायडर्सनी आपल्या सहभागातून दाखवून दिले. विशेष म्हणजे वाई येथील डॉ. अनिल शिंदे यांनी सिंगल गिअर सायकलवरून ही राईड पूर्ण केली.
लहान मुलांचाही या सायक्लोथॉनमधील सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. अवघ्या १० वर्षांच्या मेघराज कळमकर याच्यासह अद्वैत जोशी, ग्रिष्मा चव्हाण, रिद्धिमा चव्हाण, शल्व हेदूकर, सम्यक जैन, श्रीराम शिंदे, स्वराज राजपूरकर, आयुष शिंदे आणि वरद कदम या बालसायकलस्वारांनीही ही राईड यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यामुळे लहान मुलांमध्ये सायकलिंगची आवड निर्माण करण्याच्या दापोली सायकलिंग क्लबच्या उद्देशाला या उपक्रमातून प्रोत्साहन मिळाले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विविध संस्था आणि संघटनांचे मोलाचे सहकार्य लाभले. दापोली शिक्षण संस्था, दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजची टीम, दापोली तालुका आरोग्य अधिकारी व त्यांची टीम, दापोली पोलीस टीम, मेनेकी न्यूट्रीशन टीम आणि राहुल मंडलिक यांनी सहकार्य केले.
या सायक्लोथॉनच्या नियोजनासाठी अंबरीश गुरव, प्रशांत पालवणकर, राजेशकुमार कदम, राजेंद्र नाचरे आणि सुनील रिसबूड यांच्यासह अनेकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. सर्वांच्या सहकार्यामुळे स्पर्धेचे दहावे पर्व यशस्वीरीत्या पार पडले.
एकूणच, ज्येष्ठ सायकलस्वारांचा उत्साह, बालसायकलस्वारांचा सहभाग, आरोग्य आणि फिटनेसचा संदेश तसेच कोकणच्या निसर्गरम्य पर्यटनाचा अनुभव यांचा सुंदर संगम दापोली विंटर सायक्लोथॉन २०२६ मध्ये पाहायला मिळाला. सायकल संस्कृती रुजवण्याबरोबरच कोकण पर्यटनाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम दापोलीच्या क्रीडा आणि पर्यटन क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*









