राजापूर : रिक्षाचे भाडे घेऊन घराबाहेर पडलेला 27 वर्षीय तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय

banner 468x60

रिक्षाचे भाडे घेऊन घराबाहेर पडलेला २७ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील बारसू परिसरात समोर आली आहे. शुभम रवींद्र शिर्के असे या तरुणाचे नाव असून, तो १४ नोव्हेंबरपासून बेपत्ता आहे. अज्ञात व्यक्तीने त्याला गुप्तपणे व गैरपणे डांबून ठेवण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याचा संशय त्याच्या मामाने व्यक्त केला आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम रवींद्र शिर्के (वय २७, रा. बारसू खालचीवाडी, ता. राजापूर) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी बारसू खालचीवाडी येथील प्रभाकर सखाराम कदम (वय ६३) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. शुभम हा त्यांचा भाचा आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शुभम हा बारसू खालचीवाडी येथील आपल्या राहत्या घरातून रिक्षाचे भाडे घेऊन बाहेर पडला होता. मात्र, त्यानंतर तो घरी परतला नाही. कुटुंबीय आणि नातेवाइकांनी त्याचा परिसरात तसेच इतर ठिकाणी शोध घेतला; मात्र तो कुठेही आढळून आला नाही.

अखेर शुभम याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गुप्तपणे व गैरपणे डांबून ठेवण्याच्या उद्देशाने अपहरण केले असावे, असा संशय व्यक्त करत त्याचे मामा प्रभाकर कदम यांनी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २.३४ वाजता राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीच्या आधारे राजापूर पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०२/२०२६ नुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. बेपत्ता शुभम शिर्के याचा शोध घेण्यासह या प्रकरणामागील नेमके कारण आणि परिस्थितीचा तपास राजापूर पोलीस करत आहेत.