गुहागर तालुक्यातील शीर आंबेकरवाडी येथे एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. कुडली ते चिपळूण मार्गावर धावणारी एसटी बस रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या ऐनाच्या झाडाला धडकून रस्त्याखालील मोरीच्या चरात गेली. या अपघातात पाच प्रवाशांसह एसटी बसचा वाहक असे एकूण सहा जण जखमी झाले असून, बसचेही नुकसान झाले आहे. ही घटना ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात बसचालकाविरोधात १५ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश पांडुरंग दोडके (वय ३७, मूळ रा. तोंडापूर, ता. जामनेर, जि. जळगाव, सध्या रा. तेलीवाडी, गुहागर) हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गुहागर आगारात चालक म्हणून कार्यरत आहेत. ४ नोव्हेंबर रोजी ते एमएच १४ बीटी २७६५ क्रमांकाची एसटी बस घेऊन कुडली ते चिपळूण असा प्रवास करत होते.
आबलोली ते शीर-शृंगारतळी मार्गावरून बस जात असताना शीर आंबेकरवाडी परिसरात सकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास चालकाने बस भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालविल्याचा आरोप आहे. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष झाल्याने बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या चालकाच्या बाजूकडील ऐनाच्या झाडावर जाऊन आदळली. या धडकेत झाड मोडले आणि बस रस्त्याखाली असलेल्या मोरीच्या चरात जाऊन थांबली.
पाच प्रवासी आणि वाहक जखमी
या अपघातात बसमधून प्रवास करणारे दर्शनी देवदास पावरी (वय ४५), प्रतिभा पुरुषोत्तम हरचकर (वय ६७), राखी राकेश हरवकर (वय ३३), अमृता आत्माराम वासावे (वय ६५) आणि भाग्यश्री भाग्यवान हरचकर (वय ४५) हे पाच प्रवासी जखमी झाले. तसेच एसटी बसवरील वाहक सुभाष भिमू राठोड (वय ४२) हेही जखमी झाले आहेत.
सर्व जखमी कुडली, बंदरवाडी परिसरातील असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे. अपघातात जखमी झालेल्यांच्या उजव्या पायाच्या मांडीला आणि कंबरेला मुकामार लागून दुखापत झाली. या अपघातामुळे एसटी बसचेही नुकसान झाले आहे.
११ दिवसांनंतर गुन्हा दाखल
या अपघाताची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात १५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८.२१ वाजता करण्यात आली. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी किशोर शशिकांत साळवी (बक्कल क्रमांक ६५१) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार एसटी बसचालक गणेश पांडुरंग दोडके यांच्याविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक ११८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ) तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघाताचा पुढील तपास गुहागर पोलीस करीत आहेत.
दरम्यान, प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा अशा प्रकारे अपघात झाल्याने सार्वजनिक वाहतुकीतील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











