Breaking News
दाभोळ : प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात वणौशी-दुमदेवमधील ग्रामस्थांचे राज्यमंत्री योगेश कदम यांना निवेदन, लवकरच गावाला भेट देण्याचे आश्वासन दापोली : चिखलगावच्या लोकमान्य टिळक विद्यालयाच्या ‘स्किल बॉक्स’ उपक्रमाची शासनस्तरावर दखल, चिखलगावच्या लोकमान्य टिळक विद्यालयाचा गौरव, शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांच्या पुढाकारातून उपक्रमाचा विस्तार चिपळूण : 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या चिपळूण : तळवडेच्या छोट्याशा गावातून डॉक्टर होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास, शाळेत शिपाई म्हणून राबणाऱ्या वडिलांचं स्वप्न मुलाने केलं पूर्ण! कष्टाचं चीज झालं, शुभम कोकरे बनले डॉक्टर! गुहागर-चिपळूण मार्गावरीलघोणसरे चिवेली फाट्यावर अपघात, महिला गंभीर जखमी

चिपळूण : तळवडेच्या छोट्याशा गावातून डॉक्टर होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास, शाळेत शिपाई म्हणून राबणाऱ्या वडिलांचं स्वप्न मुलाने केलं पूर्ण! कष्टाचं चीज झालं, शुभम कोकरे बनले डॉक्टर!

banner 468x60

परिस्थिती कितीही हलाखीची असली, खिशात पैसा नसला, तरी मनात जिद्द आणि डोळ्यांत स्वप्न असेल तर यशाला गवसणी घालता येते, हे तळवडे (ता. चिपळूण) येथील डॉ. शुभम कोकरे यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. शाळेत शिपाई म्हणून काम करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वडिलांच्या कष्टांना आणि काटकसर करून संसाराचा गाडा ओढणाऱ्या आईच्या त्यागाला शुभम यांनी आपल्या यशातून खऱ्या अर्थाने सलाम केला आहे. बी.ए.एम.एस. (BAMS) ही वैद्यकीय पदवी संपादन करून त्यांनी डॉक्टर होण्याचे आपले स्वप्न साकार केले आहे.

तळवडे या छोट्याशा खेडेगावात राहणाऱ्या धोंडीबा कोकरे आणि ताई कोकरे या दाम्पत्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलाला शिकवले. वडील धोंडीबा कोकरे शाळेत शिपाई म्हणून काम करत होते. मिळणाऱ्या मर्यादित उत्पन्नातून घरखर्च भागवताना मुलाच्या शिक्षणासाठी पैसे जमवणे हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान होते. तर आई ताई कोकरे यांनी संसारात काटकसर करत, स्वतःच्या अनेक इच्छा बाजूला ठेवत मुलाच्या शिक्षणाला प्राधान्य दिले.

कधी आर्थिक अडचणी, कधी परिस्थितीची ओढाताण, तर कधी भविष्याची चिंता… अशा अनेक संकटांवर मात करत या आई-वडिलांनी शुभम यांच्या शिक्षणात कोणतीही कमतरता राहू दिली नाही. स्वतःच्या आयुष्यात कितीही कष्ट आले तरी मुलाने मोठे व्हावे, त्याने डॉक्टर बनावे, हेच त्यांचे एकमेव स्वप्न होते.

आज शुभम यांनी बी.ए.एम.एस. ही पदवी मिळवत डॉक्टर म्हणून आपली ओळख निर्माण केली आणि आई-वडिलांच्या आयुष्यातील सर्व कष्टांचे सार्थक केले. मुलाच्या गळ्यात डॉक्टरकीची पदवी पाहताना एका शिपाई वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले असतील आणि मुलाच्या यशाने आईच्या कष्टाचे मोलही आज सार्थ ठरले असेल.

“आम्ही आयुष्यभर कष्ट केले, काटकसर केली; पण मुलाने शिकून मोठे व्हावे, डॉक्टर व्हावे, हेच आमचे स्वप्न होते. आज मुलगा डॉक्टर झाला, आमचे स्वप्न पूर्ण झाले. यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणता असू शकतो,” अशी भावनिक प्रतिक्रिया शुभम यांच्या पालकांनी व्यक्त केली.

शुभम यांचे हे यश केवळ एका कुटुंबाचे यश नाही, तर परिस्थितीशी झुंज देणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य आई-वडिलांच्या संघर्षाचा सन्मान आहे. वडिलांच्या घामाला आणि आईच्या त्यागाला मिळालेली ही यशाची पावती आहे. गावातील एका सामान्य कुटुंबातील मुलगा डॉक्टर होतो, तेव्हा त्या यशामागे केवळ त्याची मेहनत नसते, तर आई-वडिलांनी पाहिलेली असंख्य स्वप्ने आणि सोसलेल्या वेदनाही असतात.

शिपाई वडिलांच्या कष्टांना डॉक्टर मुलाने दिलेला हा मानाचा मुजरा आज तळवडे गावासाठी अभिमानाचा आणि नव्या पिढीसाठी प्रेरणेचा विषय ठरला आहे. डॉ. शुभम कोकरे यांच्या पुढील वैद्यकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *