चिपळूण : टेरवमधील मोबाईल टॉवरविरोधातील महिलांचे साखळी उपोषण स्थगित!

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील टेरव येथे लोकवस्तीत उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवरविरोधात महिलांनी सुरू केलेले साखळी उपोषण गुरुवारी, २२ ऑक्टोबर रोजी तूर्तास स्थगित केले. कंपनीने आवश्यक कागदपत्रे सादर करेपर्यंत टॉवरला वीजजोडणी देऊ नये, अशी मागणी ग्रामपंचायतीकडून महावितरणकडे केली जाणार आहे. तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाने टॉवर आणि रस्त्यादरम्यानच्या अंतराची प्रत्यक्ष मोजणी केल्याने या प्रकरणातील प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.


टेरव येथे लोकवस्तीत मोबाईल टॉवर उभारण्याच्या निर्णयाला ग्रामस्थांनी ग्रामसभेत विरोध दर्शवला होता. मात्र, ग्रामस्थांचा विरोध डावलून कंपनीने टॉवर उभारल्याचा आरोप करण्यात आला. या टॉवरमुळे नागरिकांच्या मनात चिंता निर्माण झाल्याने तो लोकवस्तीपासून दूर हलवावा, अशी मागणी महिलांनी केली होती. यासाठी ग्रामस्थांनी पर्यायी जागा मोफत उपलब्ध करून देण्याची तयारीही दर्शवली होती.


या मागणीसाठी महिलांनी १६ ऑक्टोबरपासून ग्रामपंचायतीसमोर साखळी उपोषण सुरू केले होते. बुधवारी संबंधित अधिकारी, कंपनीचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्यात बैठक झाली. मात्र, या बैठकीत कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने महिलांनी उपोषण सुरूच ठेवले होते.


दरम्यान, गुरुवारी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून टॉवर आणि रस्त्यादरम्यानच्या अंतराची प्रत्यक्ष मोजणी करण्यात आली. तसेच कंपनीकडून आवश्यक कागदपत्रे सादर होईपर्यंत टॉवरला वीजजोडणी देऊ नये, अशी मागणी करणारे पत्र महावितरणला देण्याची भूमिका ग्रामपंचायतीने घेतली आहे.


या घडामोडींनंतर महिलांनी आपले साखळी उपोषण तूर्तास स्थगित केले आहे. मात्र, मोबाईल टॉवरबाबत प्रशासनाकडून नेमका काय निर्णय घेतला जातो, कंपनीकडून आवश्यक कागदपत्रे सादर केली जातात का आणि ग्रामस्थांच्या मागण्यांवर तोडगा निघतो का, याकडे आता टेरव ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *