लांज्यात कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात रिक्षा पलटी, देवधेच्या उपसरपंचांचा मृत्यू

banner 468x60

लांजा तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धनावडे शेती फार्म परिसरात रस्त्यावर अचानक आडव्या आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात देवधे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच संजय नारायण मणचेकर (वय ४२) यांचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे देवधे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संजय मणचेकर हे देवधे गावचे रहिवासी असून रिक्षा व्यवसाय करत होते. रिक्षा संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख होती. सामाजिक कार्यात सहभागी असण्यासोबतच ते देवधे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची जबाबदारी सांभाळत होते.

बुधवारी दुपारी ते लांजा येथून रिक्षाने आपल्या घरी जेवणासाठी देवधे येथे जात होते. धनावडे शेती फार्म परिसरात त्यांची रिक्षा आली असता अचानक एक कुत्रा रस्त्यावर आडवा आला. कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात रिक्षावरील नियंत्रण सुटून रिक्षा पलटी झाली. या अपघातात संजय मणचेकर गंभीर जखमी झाले.

दरम्यान, त्यांच्या मागून दुसऱ्या रिक्षाने येणारे त्यांचे चुलतभाऊ प्रकाश जानू मणचेकर यांनी हा अपघात पाहिला. त्यांनी तातडीने संजय यांना स्वतःच्या रिक्षातून लांजा येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

संजय मणचेकर यांच्या आकस्मिक निधनाने देवधे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने ग्रामपंचायत तसेच रिक्षा व्यवसायाशी संबंधित सहकाऱ्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे.

या अपघाताचा पुढील तपास लांजा पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *