गुहागर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या असगोली गावात नवरात्रोत्सवाच्या काळात सलग दोन दिवस चोरीच्या घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. १८ आणि १९ ऑक्टोबर रोजी भजनाची डबलबारी आणि दांडियाचा कार्यक्रम सुरू असताना दोन वेगवेगळ्या घरांमधून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान गुहागर पोलिसांसमोर आहे.
असगोली येथील श्री व्याघ्रांबरी मंदिरासमोरील जागेत श्री नवरात्रोत्सवानिमित्त १८ ऑक्टोबर रोजी भजनाच्या डबलबारीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परिसरात भजनाचा कार्यक्रम रंगलेला असताना याच भागातील मनश्री महेश असगोलकर यांच्या घराला चोरट्याने लक्ष्य केले. घराच्या स्लायडिंग खिडकीची जाळी कापून चोरट्याने आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटाचे कुलूप फोडून त्यामधील एक ग्रॅम सोन्याचा हार चोरून नेल्याची घटना घडली.
पहिल्या चोरीच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजे १९ ऑक्टोबर रोजी पुन्हा चोरी झाल्याचे समोर आले. नवरात्रोत्सवादरम्यान परिसरात दांडियाचा कार्यक्रम सुरू असताना रेवती सुरेश धोपावकर यांच्या घरातील कुलूप न लावलेल्या कपाटातून दोन तोळे सोन्याची चेन चोरीला गेली. सलग दोन दिवस एकाच परिसरात चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
उत्सवाच्या काळात परिसरात नागरिकांची वर्दळ असतानाही चोरट्यांनी घरांमध्ये प्रवेश करून दागिने लंपास केल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या दोन्ही घटनांप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
असगोलीतील या सलग चोरीच्या घटनांचा छडा लावून संबंधित चोरट्यांना पकडण्याचे आव्हान आता गुहागर पोलिसांसमोर आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













