मंडणगड : पाचरळ फाटा येथे अवैध दारूसाठ्यावर पोलिसांची कारवाई, 6 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त

banner 468x60

मंडणगड तालुक्यातील पाचरळ फाटा येथील एका हॉटेलच्या पाठीमागे विक्रीच्या उद्देशाने अवैधरीत्या देशी दारू आणि बिअरचा साठा बाळगल्याप्रकरणी मंडणगड पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ६ हजार २४० रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला असून, एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६.१० वाजण्याच्या सुमारास पाचरळ फाटा येथे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल वैशाली सुकाळे यांनी तक्रार दाखल केली आहे.

या गुन्ह्यात सचिन शांताराम खताते (वय ४३, रा. मंडणगड, ता. मंडणगड) याच्याविरुद्ध मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२६/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत ३ हजार ८४० रुपये किमतीच्या १८० मिली क्षमतेच्या देशी दारूच्या ४८ प्लास्टिक बाटल्या, तसेच २ हजार ४०० रुपये किमतीच्या ७५० मिली क्षमतेच्या ट्युबर्ग बिअरच्या १२ काचेच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या दोन्ही प्रकारच्या दारूसाठ्याची एकूण किंमत ६ हजार २४० रुपये आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास मंडणगड पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *