दापोली : सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा जंगलात मृतदेह

banner 468x60

घरातून बाहेर पडल्यानंतर सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ५१ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह कुंभवे येथील जंगलमय परिसरात आढळून आला. संतोष जयराम तांबे (वय ५१, रा. इनामपांगारी-बौद्धवाडी, ता. दापोली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष तांबे हे १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. मात्र, त्यानंतर ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीय, त्यांचा मुलगा, नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून त्यांचा शोध सुरू होता. सहा दिवसांपासून त्यांचा शोध घेतला जात असतानाच २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कुंभवे गावच्या हद्दीतील सामाजिक वनीकरणाच्या जंगलमय परिसरात ते मृतावस्थेत आढळून आले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी तपासणी करून त्यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ७९/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. संतोष तांबे यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी दापोली पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *