लांजा तालुक्यातील आरगाव खालील वाडी येथे दगडी विहिरीत 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना शुक्रवारी, २ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. मयूर प्रकाश जाधव (वय २८, रा. आरगाव खालील वाडी, ता. लांजा) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे आरगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयूर जाधव याच्या कमरेखालील शरीराची संवेदना कमी झाल्याने त्याच्यावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालय तसेच पाली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, २ ऑक्टोबर रोजी तो घरातील कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेला होता.
मयूर बराच वेळ घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीय, नातेवाईक आणि वाडीतील नागरिकांनी त्याचा शोध सुरू केला. शोध घेत असतानाच मनोहर खामकर यांच्या दगडी विहिरीतील पाण्यावर मयूरचा मृतदेह तरंगताना आढळून आला. मृतदेहामध्ये कोणतीही हालचाल दिसून न आल्याने नागरिकांनी तातडीने त्याला बाहेर काढून रुग्णवाहिकेच्या मदतीने लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
लांजा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दुपारी २.१० वाजता मयूर जाधव याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर लांजा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. विजय तुकाराम जाधव (वय ३८, रा. आरगाव खालील वाडी) यांनी दिलेल्या खबरीवरून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तरुणाचा विहिरीत मृतदेह नेमका कोणत्या परिस्थितीत आढळून आला, याचा तपास पोलीस करत आहेत. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन व पोलिसांच्या पुढील तपासानंतर स्पष्ट होणार आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार शेलार या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













