मंडणगड शहरातील भिंगळोली समर्थनगर परिसरात बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्याने कपाटातील लॉकर फोडून तब्बल २ लाख १८ हजार ५८५ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. २८ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास ते रात्रीपर्यंत घर बंद असल्याची संधी साधून ही चोरी करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
भिंगळोली समर्थनगर येथील रहिवासी राजश्री अरुण सुतार (वय ४८) यांच्या घरी ही चोरी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता राजश्री सुतार घर बंद करून बाहेर गेल्या होत्या. रात्री सुमारे १०.३० वाजता त्या घरी परतल्यानंतर घरातील कपाटाच्या लॉकरची पाहणी केली असता लॉकर उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
लॉकरमधील सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटाच्या लॉकरमधून सुमारे २६.७२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे तपासात समोर आले.
चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये ९६ हजार रुपये किमतीचे मणीमंगळसूत्र, ६० हजार २१५ रुपये किमतीचे सोन्याचे पेंडंट आणि ६२ हजार ३७० रुपये किमतीच्या सोन्याच्या कानातील रिंगांचा समावेश आहे. या सर्व दागिन्यांची एकूण किंमत २ लाख १८ हजार ५८५ रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी राजश्री सुतार यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी व पंचनामा केला. घरात चोरट्याने प्रवेश कसा केला, चोरीपूर्वी परिसराची पाहणी करण्यात आली होती का आणि या घटनेमागे सराईत चोरट्यांचा सहभाग आहे का, या विविध शक्यतांच्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
बंद घरांना लक्ष्य करून झालेल्या या चोरीमुळे भिंगळोली समर्थनगर परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान मंडणगड पोलिसांसमोर आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













