लांजा ते कल्याण प्रवासादरम्यान सुमारे सात लाख रुपये किमतीचे मौल्यवान दागिने असलेली बॅग एसटी बसमध्येच राहून गेल्याची घटना समोर आली. मात्र बसचालकाच्या प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेमुळे ही बॅग व त्यातील सर्व दागिने सुखरूप परत मिळाल्याने बंडबे कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला.
गणेशोत्सवानिमित्त लांजा आगारातून विविध मार्गांवर जादा एसटी बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. याचदरम्यान मुळचे कुवे येथील रहिवासी आणि सध्या डोंबिवली येथे वास्तव्यास असलेले सुधीर नारायण बंडबे हे सोमवारी, २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजता लांजा येथून कल्याणकडे जाणाऱ्या एसटी बसने प्रवास करीत होते.
प्रवास पूर्ण करून ते बसमधून उतरले. मात्र त्यानंतर काही वेळाने त्यांच्या लक्षात आले की, सुमारे सात लाख रुपये किमतीचे मौल्यवान दागिने असलेली बॅग बसमध्येच राहिली आहे. त्यामुळे बंडबे यांनी तातडीने कुवे येथील आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी मंगळवारी, २२ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे ४.४५ वाजता लांजा आगाराचे वाहतूक निरीक्षक ललित आयरे यांच्याशी संपर्क साधला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत आयरे यांनी तातडीने संबंधित एसटी बसचा शोध घेतला आणि चालक मोतीलाल नवल कोळी यांच्याशी संपर्क साधला.
बसची तपासणी केली असता प्रवाशाची दागिन्यांची बॅग बसमध्येच असल्याचे चालक कोळी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी कोणताही विलंब न करता ती बॅग सुरक्षितपणे ताब्यात घेतली. त्यानंतर बंडबे यांच्याशी दागिन्यांची ओळख पटवून घेण्यात आली आणि बॅगमधील सर्व मौल्यवान वस्तू त्यांच्या स्वाधीन करण्यात आल्या.
विशेष म्हणजे, गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी असतानाही चालक कोळी यांनी लाखो रुपये किमतीचे दागिने असलेली बॅग प्रामाणिकपणे परत केली. संबंधित जादा एसटी बस जळगाव जिल्ह्यातील चोपडा आगाराची असून, चालक मोतीलाल कोळी हे चोपडा आगारात कार्यरत आहेत.
बॅग आणि त्यातील मौल्यवान दागिने सुरक्षितपणे परत मिळाल्याने सुधीर बंडबे व त्यांच्या कुटुंबीयांनी चालक मोतीलाल कोळी तसेच लांजा आगारातील संबंधित कर्मचाऱ्यांचे आभार मानले. गणेशोत्सवाच्या गर्दीतही दाखविलेल्या या प्रामाणिकपणाचे आणि कर्तव्यनिष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लाखोंची संपत्ती समोर असूनही मोह न बाळगता ती योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचविणाऱ्या एसटी चालकाच्या या कृतीने ‘प्रामाणिकपणा अजूनही जिवंत आहे’ याचा प्रत्यय दिला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













