रत्नागिरी : गणेश विसर्जनासाठी रत्नागिरीतील वाहतूक मार्गात बदल, गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचं नियोजन

banner 468x60

गौरी-गणपती आणि अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरात होणाऱ्या विसर्जन मिरवणुका तसेच नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी यासंदर्भात प्रसिद्धीपत्रकाद्वारे आदेश जारी केले आहेत.

१९ सप्टेंबर (गौरी-गणपती विसर्जन), २३ सप्टेंबर (दहा दिवसांचे गणपती), २५ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) आणि २६ सप्टेंबर (अनंत चतुर्दशीचा दुसरा दिवस) या चार दिवशी दुपारी २ ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतूक मार्गातील हे बदल लागू राहणार आहेत.

भुतेनाक्याहून मांडवीकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग

विसर्जनाच्या कालावधीत भुतेनाका–भंडग तिठा–मांडवी समुद्रकिनारा या नियमित मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्याऐवजी वाहनचालकांनी भुतेनाका–मिरकरवाडा तिठा–मत्स्यालय–मांडवी समुद्रकिनारा या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे पोलिसांनी कळविले आहे.

केवळ विसर्जन वाहनांनाच प्रवेश

मांडवी समुद्रकिनाऱ्यावर गणेश विसर्जनासाठी एकाच वेळी सुमारे ७ ते ८ हजार भाविक आणि विसर्जन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी तसेच पार्किंगची समस्या टाळण्यासाठी केवळ गणेशमूर्ती घेऊन येणाऱ्या वाहनांनाच विसर्जनस्थळी प्रवेश दिला जाणार आहे. इतर खासगी वाहनांना या परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना सवलत

वाहतूक नियंत्रणासंदर्भातील हे आदेश पोलीस वाहने, अग्निशामक दलाची वाहने, रुग्णवाहिका तसेच व्हीआयपी किंवा शासकीय दौऱ्याशी संबंधित अधिकृत वाहनांना लागू राहणार नाहीत. आणीबाणीच्या परिस्थितीत घटनास्थळी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

वाहतूक व्यवस्थेतील या बदलांबाबत नागरिक किंवा वाहनचालकांना काही हरकती अथवा आक्षेप असल्यास त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधून ते नोंदवावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *