राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. दरम्यान, आज (ता. १९) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. उर्वरित राज्यातही काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीये.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सध्या विस्कळीत झाला आहे. कमी दाबाची प्रणाली निवळल्यानंतर उत्तर गुजरात आणि परिसरात समुद्रसपाटीपासून १.५ ते ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच उत्तर तमिळनाडू परिसरात समुद्रसपाटीपासून सुमारे ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मराठवाड्यापासून कर्नाटकमार्गे आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे.
‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट
आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि सातारा, तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र
उत्तर थायलंड आणि परिसरात समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे आज (ता. १९) उत्तर अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. पुढे ही प्रणाली ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याच्या दिशेने सरकताना तीव्र होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
मॉन्सूनच्या परतीला आजपासून सुरुवात होण्याची शक्यता
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या अर्थात मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टाही विस्कळीत झाला आहे. त्यामुळे आज (ता. १९) पश्चिम राजस्थानातून मॉन्सूनच्या माघारीस सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर देशातील विविध भागांत परतीच्या पावसाचा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे.
सोलापुरात सर्वाधिक तापमान
शुक्रवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जेऊर, अमरावती, परभणी, अकोला आणि वर्धा येथेही कमाल तापमान ३६ अंशांपेक्षा अधिक होते. चंद्रपूर येथे ३५ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले. तर महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













