गणेशोत्सवासाठी मुंबई आणि पुण्यातून रेल्वेने रत्नागिरीत दाखल होणाऱ्या जिल्हावासीयांना रेल्वे स्थानकावरून पुढील प्रवासासाठी काही रिक्षाचालकांकडून अवाजवी भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. प्रवाशांकडून अशाप्रकारे भरमसाठ भाडे आकारून होणारी लूट अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिला आहे.
आगामी १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात गणेशोत्सव साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था तसेच उत्सव काळातील विविध व्यवस्थांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत रिक्षाचालकांकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी भाड्याचा मुद्दा उपस्थित झाला.
यावेळी जिल्हाधिकारी जिंदल यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाने या प्रकारावर तातडीने नियंत्रण ठेवावे आणि जादा भाडे आकारणाऱ्या रिक्षाचालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश दिले.
शहरातील वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतही बैठकीत महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या. गणेशोत्सव काळात रस्त्यांवर मोकाट गुरांचा त्रास होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, शहरातील फुटपाथ अतिक्रमणमुक्त करावेत आणि पकडण्यात आलेल्या जनावरांच्या संवर्धनासाठी योग्य नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले.
जड व अवजड वाहनांच्या प्रवेशाबाबत योग्य नियोजन करण्यासोबतच नो-पार्किंग आणि अन्य वाहतूकविषयक महत्त्वाचे फलक नागरिकांना सहज दिसतील अशा ठिकाणी लावावेत, अशाही सूचना देण्यात आल्या.
गणेशोत्सवादरम्यान वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणने विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले. गणपती विसर्जन स्थळांवर पुरेशी प्रकाशयोजना, सुरक्षा रक्षक तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी बोटींची व्यवस्था उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या. विसर्जनाचे मार्ग आधीच निश्चित करून आवश्यक नियोजन करण्याचे आदेशही देण्यात आले.
रामनाका ते विठ्ठल मंदिर रस्त्यावरील अतिक्रमणाचाही मुद्दा बैठकीत चर्चेत आला. फळविक्रेत्यांनी रस्त्यावर गाड्या उभ्या केल्याने तसेच दुचाकींच्या बेवारस पार्किंगमुळे पादचारी आणि ग्राहकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. हा त्रास दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करून रस्ता मोकळा करण्याचे निर्देश देण्यात आले.
शांतता समितीच्या सदस्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत जलद संपर्क आणि माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सदस्यांना अधिकृत ओळखपत्रे देण्यासोबतच विशेष व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी जिंदल यांनी दिल्या.
या बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सहायक पोलीस अधीक्षक आकांशा यादव, मुख्याधिकारी वैभव गारवे आदी अधिकारी उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे हे दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी तसेच जिल्हा शांतता समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













