देवरुख येथील विवाह सोहळा आटोपून घरी परतताना पांगरी येथील धोकादायक वळणावर झालेल्या भीषण अपघाताने हातखंबा बौद्धवाडीवर कोसळलेले दुःख अखेर आणखी गडद झाले आहे. या अपघातात यापूर्वीच दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता. गंभीर जखमी झालेल्या विकास चंद्रकांत कांबळे यांची गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर संपली. मुंबईतील कांदिवली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना १२ सप्टेंबर रोजी त्यांचे निधन झाले. या दुर्घटनेतील तिन्ही तरुणांचा मृत्यू झाल्याने हातखंबा परिसरावर शोककळा पसरली आहे.
पांगरीच्या धोकादायक वळणावर अपघात
हातखंबा येथील काही तरुण देवरुख येथे विवाह सोहळ्यासाठी गेले होते. २६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास दुचाकीवरून देवरुखहून परतत असताना पांगरी येथील धोकादायक वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटून भीषण अपघात झाला.
या दुर्घटनेत सुमित विलास कांबळे आणि विकास काशीराम कांबळे या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर विकास चंद्रकांत कांबळे गंभीर जखमी झाले होते.
दोन शस्त्रक्रिया; सहा महिने सुरू होती झुंज
अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या विकास यांना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने कुटुंबीयांनी दुसऱ्याच दिवशी त्यांना रत्नागिरी शहरातील खासगी रुग्णालयात हलविले.
तेथे अनेक दिवस उपचार सुरू होते. प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांच्यावर एकापाठोपाठ दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र अपघातानंतर ते कोमात होते. उपचार करूनही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईला हलविण्यात आले.
ठाण्यानंतर कांदिवली येथील खासगी रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या आशा कायम असतानाच उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने अखेर सहा महिन्यांची ही झुंज १२ सप्टेंबर रोजी संपली.
एकुलता एक मुलगा गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर
विकास हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अपघातानंतर त्याला वाचविण्यासाठी कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराने शर्थीचे प्रयत्न केले. सहा महिन्यांपासून आशेवर दिवस काढणाऱ्या कुटुंबीयांना विकासच्या निधनाच्या वार्तेने मोठा धक्का बसला.
मुंबई येथील निवासस्थानी १२ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आला. यावेळी मित्रपरिवार आणि आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘डान्सर विकास’च्या आठवणी कायम राहणार
विकास चंद्रकांत कांबळे हे केवळ मित्रपरिवारातच नव्हे, तर उत्तम नृत्यकलाकार म्हणूनही परिचित होते. विशेषतः लहान मुलांशी सहज संवाद साधत त्यांना नृत्याची गोडी लावणे आणि विविध स्पर्धांसाठी तयार करणे, ही त्यांची खास शैली होती.
नृत्य शिकवताना ते मुलांना केवळ नृत्याच्या स्टेप्स शिकवत नसत, तर त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करत. स्वतः नृत्य करून मुलांचा उत्साह वाढविणारे विकास अनेक मुलांसाठी ‘विकास दादा’ होते.
त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर मित्र, नातेवाईक तसेच त्यांनी नृत्य शिकवलेल्या मुलांकडून भावनिक श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे. ‘मिस यू विकास दादा… आम्हाला डान्स कोण शिकवणार?’ अशा भावनिक शब्दांत अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
एका अपघाताने तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर
पांगरीच्या त्या धोकादायक वळणावर झालेल्या एका अपघाताने तीन तरुणांचे आयुष्य हिरावून घेतले. सुमित विलास कांबळे, विकास काशीराम कांबळे आणि विकास चंद्रकांत कांबळे हे तिन्ही तरुण आता केवळ आठवणींत उरले आहेत.
दोन तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर तिसऱ्या विकास यांनी तब्बल सहा महिने मृत्यूशी झुंज दिली. मात्र अखेर त्यांचीही प्राणज्योत मालवली. या घटनेने हातखंबा बौद्धवाडीतील तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या अपघाताची वेदना परिसराच्या मनात कायमची घर करून राहिली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













