राजापूर येथे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरून झालेल्या अल्प परिचयाचा गैरफायदा घेत एका अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आणि या घटनेचे चित्रीकरण करून व्हिडिओ प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार राजापुरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाविरुद्ध पोक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्रामवरून शहरातच शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलाशी ओळख झाली होती. काही दिवसांच्या परिचयानंतर संबंधित मुलाने तिला आमिष दाखवून १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी १२ या वेळेत कोदवली-साईनगर परिसरातील एका लॉजवर नेल्याचा आरोप आहे. तेथे तिच्यावर अत्याचार केल्याचे तसेच या घटनेचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
यानंतर संशयिताने संबंधित व्हिडिओ आपल्या मित्राला ‘वन टाइम व्ह्यू’च्या माध्यमातून पाठवला. मात्र त्या मित्राने दुसऱ्या मोबाइलच्या मदतीने त्याचे चित्रीकरण करून तो व्हिडिओ अन्य व्यक्तीला पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
हा व्हिडिओ पीडित मुलीच्या नातेवाइकापर्यंत पोहोचल्यानंतर त्याने तिच्याकडे चौकशी केली. त्यावेळी हा संपूर्ण प्रकार समोर आला. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून राजापूर पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हिडिओ पुढे प्रसारित करणाऱ्या व्यक्तींचा पोलिसांकडून शोध सुरू असून त्यांच्याविरुद्धही कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अल्पवयीन मुला-मुलीला लॉजमध्ये प्रवेश देणाऱ्या संबंधित चालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
अल्पवयीन पीडितेची ओळख उघड होईल अशी कोणतीही माहिती किंवा संबंधित व्हिडिओ प्रसारित करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













