चिपळूण : कत्तलीच्या उद्देशाने गुरांची निर्दय वाहतूक, तिघांविरुद्ध गुन्हा, तीन बैलांसह बोलेरो पिकअप असा 4.65 लाखांचा मुद्देमाल जप्त

banner 468x60

चिपळूण तालुक्यात कत्तलीच्या उद्देशाने तीन बैलांची निर्दयपणे आणि विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत तीन बैल आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली बोलेरो पिकअप असा एकूण ४ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई ७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९.५५ वाजता शिरगावहून अलोरेकडे जाणाऱ्या मार्गावर कुंभार्ली गावाच्या अलीकडील नदीच्या पुलावर करण्यात आली. पोलिसांनी संबंधित बोलेरो पिकअप (एमएच ५० एन ५४७८) थांबवून तपासणी केली असता वाहनाच्या मागील बाजूच्या हौद्यात तीन बैल दाटीवाटीने आणि आखूड दोरीने बांधून ठेवल्याचे आढळून आले.

या पद्धतीने वाहतूक केल्यामुळे बैलांना वेदना व यातना होण्याची शक्यता असतानाही त्यांची निर्दयपणे वाहतूक करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तसेच ही गुरे कत्तलीसाठी किंवा कत्तलीच्या उद्देशाने विक्री करण्यासाठी विनापरवाना नेली जात असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

या प्रकरणी अजय सुरेश साळुंखे (२७), आकाश प्रकाश साळुंखे (२९) आणि किरण सुरेश साळुंखे (२५) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघेही मूळचे बत्तीस शिराळा, जिल्हा सांगली येथील असून सध्या देवरुख येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

६५ हजारांचे तीन बैल जप्त

जप्त करण्यात आलेल्या तीन बैलांची अंदाजे किंमत अनुक्रमे २५ हजार, २० हजार आणि २० हजार रुपये, अशी एकूण ६५ हजार रुपये आहे. तर वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअपची किंमत सुमारे ४ लाख रुपये आहे. त्यामुळे जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ४ लाख ६५ हजार रुपये इतकी आहे.

या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० मधील कलम ११(१)(ए), ११(१)(डी), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११९, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ मधील कलम ९, तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास अलोरे-शिरगाव पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *